ठाण्याहून थेट दक्षिण मुंबई गाठता येणार! pudhari photo
मुंबई

Mumabi Thane Metro: ठाण्याहून थेट दक्षिण मुंबई गाठता येणार, 13 स्थानके- 17.51 किमी लांबीचा मार्ग, असा आहे मेट्रोचा प्रस्ताव

Mumbai Thane Metro Line: आणिक आगार ते गेट वे असा मेट्रोचा प्रस्ताव, 13 स्थानकांचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

Thane Anik Agar Depot to Gateway of India Metro Route

विवेक कांबळे

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसी) ठाण्यातील आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियादरम्यान भुयारी मेट्रो-11 बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला असून या प्रस्तावाला मंजुरीची प्रतीक्षा आहे.

ही भुयारी मेट्रो 17.51 किमी लांबीची असणार असून या मेट्रो मार्गिकेमुळे शीव, वडाळा, शिवडी, भायखळा, भेंडी बाजारसारखे परिसर जोडले जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

‘एमएमआरसी’ने हाती घेतलेले कुलाबा वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो 3 मार्गिकेचे काम येत्या काही महिन्यांत पूर्ण होईल आणि ही संपूर्ण मेट्रो मार्गिका सेवेत दाखल होईल. मेट्रो 3 मार्गिकेचे काम लवकरच संपुष्टात येणार असल्याने आता ‘एमएमआरसी’ने मेट्रो 11 मार्गिकेच्या कामाला सुरुवात करण्याच्यादृष्टीने विचार सुरू केला आहे. त्यानुसार काही महिन्यांपूर्वी मेट्रो 11 मार्गिकेचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे.

मेट्रो मार्गिका 11 वरील 13 स्थानकांपैकी आठ स्थानके कट अँड कव्हर पद्धतीने बांधण्यात येतील. ज्यात खोदकाम, बोगदा बांधणे, पृष्ठभाग पुनर्संचयित करणे समाविष्ट आहे. तर, उर्वरित पाच स्थानके न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड वापरून विकसित केली जातील.

एमएमआरसीएलच्या अंदाजानुसार, 2031पर्यंत दररोज 5,80,000 प्रवासी या मार्गावर प्रवास करतील. तर 2041 पर्यंत ही संख्या 8,69,000 पर्यंत पोहोचेल. सध्या हा प्रस्ताव राज्य सरकारच्या नगरविकास विभागाच्या विचाराधीन आहे. राज्याची मंजुरी मिळाल्यानंतर केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.

ही असतील स्थानके

वडाळा, शिवडी, वाडी बंदर, रे रोडहून पश्चिमेकडे भायखळा, नागपाडा जंक्शन, भेंडी बाजार, क्रॉफर्ड मार्केट, सीएसएमटी, जीपीओ, हॉर्निमन सर्कल, गेट वे ऑफ इंडियाजवळ अपोलो बंदरापर्यंत अशी ही मार्गिका असणार आहे.

13 पैकी 12 स्थानके भुयारी

या मार्गावर एकूण 13 स्थानके असतील. त्यापैकी आणिक डेपो वगळता सर्व 12 स्थानके भुयारी असतील. वडाळा ते अपोलो बंदर मेट्रो 11 ही ठाण्यातील गायमुख ते वडाळा या मेट्रो 4 अ आणि मेट्रो 4 अची विस्तारित मार्गिका आहे. तसेच, अ‍ॅक्वा लाइन (कफ परेड-बीकेसी-आरे जेव्हीएलआर), मोनोरेल आणि भायखळा, सीएसएमटीसारख्या उपनगरीय रेल्वे स्थानकांशी जोडली जाणार आहे. त्यामुळे उपनगरांतून थेट दक्षिण मुंबईत पोहोचता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT