मुंबई : आणिक आगार ते गेटवे ऑफ इंडिया या मेट्रो-११ मार्गिकेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला आहे. १७.५१ किमी लांबीच्या या मार्गिकेसाठी २३ हजार ४८७ कोटींचा खर्च येणार आहे. या मार्गिकच्या सल्लागार नेमणुकीसाठी एमएमआरसीएलने अलीकडेच निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
आरे ते कफ परेड मेट्रो-३ भुयारी मार्गिकेनंतर मेट्रो-११ या दुसऱ्या संपूर्ण भुयारी मार्गिकेची जबाबदारी एमएमआरसीएलवर सोपवण्यात आली आहे. १७.५१ किमी लांबीच्या या पूर्णपणे भूमिगत मेट्रो प्रकल्पात १४ स्थानके आहेत. या मार्गिकेमुळे आणिक आगार, वडाळा ट्रक टर्मिनल, सीजीएस कॉलनी, गणेश नगर, बीपीटी रुग्णालय, शिवडी, वाडी बंदर, दारूखाना, भायखळा, नागपाडा, भेंडी बाजार, महात्मा जोतिबा फुले मंडई, हॉर्निमन सर्कल आणि गेटवे ऑफ इंडिया ही ठिकाणे जोडली जाणार आहेत. यामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल.
पूर्णपणे भुयारी असलेल्या या मार्गिकची ८ स्थानके कट अॅण्ड कव्हर पद्धतीने बांधली जाणार आहेत. उर्वरित स्थानके न्यू ऑस्ट्रोलियन टनेलिंग मेथड वापरून बांधली जाणार आहे. २०३१ पर्यंत ५ लाख ८० हजार, तर २०४१पर्यंत ८ लाख ६९ हजार प्रवासी दैनंदिन प्रवास करतील, असा अंदाज आहे. दक्षिण मुंबईचे उत्तरेकडील टोक असलेले शीव हे या मार्गिकेच्या माध्यमातून उपनगराशी जोडले जाईल.