दहिसर पूर्व ते अंधेरी पश्चिम मेट्रो 2 अ आणि ओवरीपाडा ते गुंदवली मेट्रो 7 या संयुक्त मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्या वाढत असल्याचा दावा मेट्रो प्रशासनातर्फे करण्यात येत असला तरीही 2031पर्यंतचे नियोजित लक्ष्य पाहता सध्याची दैनंदिन प्रवासी संख्या अतिशय कमी आहे. नियोजित लक्ष्याचा विचार करता दैनंदिन प्रवासी संख्येने सव्वा चार लाखांचा टप्पा ओलांडणे अपेक्षित होते; मात्र हा आकडा 3 लाखांच्या आतच रेंगाळतो आहे.
एप्रिल 2022मध्ये मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 अंशत: सुरू करण्यात आली होती. त्यानंतर उर्वरित टप्पा जानेवारी 2023मध्ये सुरू करण्यात आला. मेट्रो सुरू झाल्यापासून गेल्या 3 वर्षांतील पहिली सर्वाधिक दैनंदिन प्रवासी संख्या 2 लाख 69 हजार 230 होती. गेल्या वर्षी 6 ऑगस्टची ही प्रवासी संख्या आहे. त्यानंतर 24 जून 2025 रोजी सर्वाधिक प्रवाशांनी प्रवास केला. यावेळी दैनंदिन प्रवासीसंख्या 2 लाख 97 हजार 600 होती.
दैनंदिन प्रवासी संख्येसाठी 2031 सालापर्यंतचे लक्ष्य ठरवण्यात आले आहे. ‘मेट्रो 2 अ’साठी हे लक्ष्य 6 लाख 9 हजार तर ‘मेट्रो 7’साठी 6 लाख 68 हजार आहे. दोन्ही मार्गिकांना एकत्रितपणे 12 लाख 77 हजारांचे लक्ष्य गाठायचे आहे. यासाठी 2022 ते 2031 या 9 वर्षांच्या कालावधीत दरवर्षी 1 लाख 41 हजार 889 नवे प्रवासी दैनंदिन संख्येत जोडले जाणे आवश्यक आहे.
यानुसार मेट्रो सुरू झाल्यापासून गेल्या 3 वर्षांत 4 लाख 25 हजार 667 इतकी दैनंदिन प्रवासी संख्या असणे आवश्यक होते; मात्र अद्याप 3 लाखांचा टप्पाही ओलांडता आलेला नाही. परिणामी मेट्रोला नियोजित लक्ष्य गाठणे आव्हानात्मक ठरणार आहे.
मेट्रो 2 अ डीएननगर येथे मेट्रो 1 मार्गिकेला जोडते तर मेट्रो 7 पश्चिम द्रुतगती मार्ग येथे ’मेट्रो 1’ला जोडते. 2 अ आणि 7 या दोन्ही मार्गिका दहिसर येथे जोडल्या जातात; मात्र इतक्या जोडण्या देऊनही प्रवासी संख्या वाढवण्यात मेट्रोला फारसे यश आलेले नाही. या दोन्ही मेट्रो मार्गिका भविष्यात स्वामी समर्थनगर ते विक्रोळी मेट्रो 6 मार्गिकेला जोडल्या जाणार आहेत. त्यानंतर प्रवासी संख्या वाढवण्यास काही प्रमाणात मदत होऊ शकते.
दैनंदिन प्रवासी संख्या गाठण्यात मेट्रोला अपयश येण्यामागील कारणे एमएमआरडीएने स्पष्ट केलेली नाहीत; मात्र रेल्वे स्थानकाला थेट जोडणी नसणे हे महत्त्वाचे कारण मानले जाऊ शकते. अंधेरी आणि घाटकोपर रेल्वे स्थानकाला जोडणार्या ‘मेट्रो 1’ला लोकलप्रमाणे गर्दी होऊ लागली आहे. इतर मेट्रो वापरण्याची मानसिकताही हळूहळू रुजत आहे.