मुंबई

मेट्रो 3 पुन्हा अश्विनी भिडेंकडे

Shambhuraj Pachindre

मुंबई : पुढारी वृत्तसेवा कारडेपोमुळे वादग्रस्त ठरलेला आणि ठाकरे व फडणवीस यांच्यातील संघर्षाचे महत्वाचे कारण ठरलेल्या मुंबई मेट्रो 3 अर्थात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा कार्यभार नव्या सरकारने पुन्हा एकदा अश्विनी भिडे यांच्याकडे सोपवला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहामुळे भिडे यांची पुनर्नियुक्ती झाल्याचे मानले जात आहे. भिडे यांना तत्काळ पदभार स्वीकारण्यास सांगण्यात आले आहे.

भिडे या मेट्रो 3 च्या व्यवस्थापकीय संचालक असताना त्यांनी अत्यंत झपाट्याने हा मार्ग पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले होते. या मार्गातील अनेक जटील प्रश्न मार्गी लावून त्यांनी प्रकल्पाला गती दिली होती. गिरगाव- काळबादेवी येथील पुनर्वसनाचा तिढाही त्यांनी कुशलतेने सोडवला होता. आरेतील कारडेपोलाही त्यांनीच चालना दिली होती. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर एका रात्रीत आरेतील वृक्ष तोडण्यात आले होते. त्यामुळे मोठे आंदोलन उभे राहिले होते. वृक्षतोड आणि कारडेपोचा मुदा त्यानंतर राजकीय झाला. सत्तेत आल्यावर आरेतील कारडेपोला स्थगिती देऊ अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. सत्तेत आल्यानंतर त्यांनी स्थगितीही दिली . तेव्हापासून कारडेपो हा ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील संघर्षाचे आणखी एक मुख्य कारण बनले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानतर त्यांनी भिडे यांची मेट्रो 3 मधून उचलबांगडी करून त्यांची मुंबई महापालिकेत अतिरिक्त पालिका आयुक्तपदी नियुक्ती केली होती. शिंदे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांची पुन्हा मेट्रो 3 च्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हा प्रकल्प वेगाने मार्गी लावण्यासाठी फडणवीस यांनीच भिडे यांच्या नियुक्तीसाठी पुढाकार घेतल्याचे समजते.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT