Mephedrone worth 17 lakhs seized in Kalyan East; Two arrested
नेवाळी : पुढारी वृत्तसेवा
कल्याण पूर्वेतील मलंगगड पट्ट्यात एमडी विक्रीसाठी आलेल्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने मलंगगड रोडवरील भाल गावाजवळ ही कारवाई केली आहे. जय रेवगडे (21), साहिल कांगणे (24) अशी दोन्ही आरोपींची नावे असून त्यांच्याकडून 17 लाखांचा ड्रग्स हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने पुढील तपास सुरू केला आहे.
उल्हासनगर परिमंडळ - 4 च्या क्षेत्रात गेल्या काही दिवसात अमली पदार्थांचे सेवन आणि विक्रीबाबत अनेक गुन्हे दाखल होत असताना ही कारवाई गुन्हे शाखेने केल्याने स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्चचिन्ह उपस्थित होत आहे.
अंबरनाथमध्ये अमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याचा आरोप सामाजिक संघटना आणि नागरिकांनी केला होता. त्यानंतर भगतसिंग नगर परिसरात एकाच आठवड्यात दोनदा कारवाई करण्याची वेळ पोलिसांवर आली. यातही हजारो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. उल्हासनगर परिमंडळ 4 च्या क्षेत्रात या घटना सातत्याने होत असताना पोलिसांकडूनही कारवाई होते आहे. मात्र असे असतानाही अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी ते पदार्थ बाळगण्याचे प्रकार समोर आले आहे.
दरम्यान जप्त केलेल्या 63.6 ग्रॅम वजानाचा मेफेड्रोनची किंमत 12 लाख 72 हजार इतकी आहे. तर किरण कांगणे याने आपल्या ताब्यात 21.5 ग्रॅम वजनाचा 4 लाख 30 हजार रुपये किमतीचा मेफेड्रोन हा अमली पदार्थ बाळगला म्हणून त्यालाही अटक करण्यातआली आहे. या प्रकरणी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.