मुंबई : आयआयटी गुवाहाटीचे पदवीधर आणि सध्या मुंबईत उत्पादन व्यवस्थापक (प्रॉडक्ट मॅनेजर) म्हणून कार्यरत असलेल्या सुदर्शन बिर्ला याने ‘म्यावमुंबई’ ही अनोखी वेबसाइट बनविली आहे. या डिजिटल व्यासपीठाच्या माध्यमातून मुंबईतील भटक्या मांजरांची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
मुंबईतील छोट्या-मोठ्या गल्ल्या, उपनगरीय रेल्वे स्थानके आणि सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या हजारो भटकी मांजरे हा एक संशोधनाचा विषय आहे. २५ वर्षीय सुदर्शनला मुंबईतील वास्तव्यादरम्यान अभ्यास करून मांजरांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या नोंदी ठेवण्यासाठी ‘म्यावमुंबई’ हे नवीन डिजिटल व्यासपीठ सुरू केले.
मुंबईत आल्यानंतर मला जागोजागी भटक्या मांजरांची मोठी संख्या दिसून आली. सुरुवातीला मी केवळ या मांजरांचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत होतो. मात्र, अनेक मांजरांना वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचे माझ्या लक्षात आले. मुंबईतील एनजीओ आणि प्राणीमित्रांचे जाळे इतके मोठे आहे की, मदतीसाठी नेमके कोणाशी संपर्क साधावा, हे समजणे कठीण असते. ही अडचण दूर करण्यासाठी आणि प्राणी कल्याणाचे काम अधिक सुलभ करण्यासाठी मी ‘म्यावमुंबई’ हे क्राऊडसोर्स्ड प्लॅटफॉर्म विकसित केले, असे सुदर्शन बिर्ला यांनी सांगितले.
मांजरांच्या माहितीची (डेटा) अचूकता राखण्यासाठी बिर्ला यांनी या वेबसाइटमध्ये काही तांत्रिक सुरक्षा उपाय केले आहेत. यामध्ये मशिन लर्निंग मॉडेलचा वापर केला असून, केवळ मांजरांचेच फोटो अपलोड होतील, याची खात्री केली जाते. मानवी चेहरे असलेले फोटो किंवा इतर अनावश्यक फोटो यात टाळले जातात.
‘म्यावमुंबई’ वेबसाइटमुळे स्थानिक प्राणी कल्याण संस्थांना गरजू मांजरांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना वेळीच उपचार किंवा दत्तक मिळवून देणे सोपे होणार आहे. नागरिकांकडून मिळणाऱ्या या माहितीमुळे भटक्या मांजरांच्या दीर्घकालीन आरोग्यावर लक्ष ठेवणे शक्य होणार असल्याचे बिर्ला यांनी स्पष्ट केले.
सुदर्शन बिर्लाने सांगितले की, ११ आणि १२वी शिकत असताना एक भटकी मांजर रोज आमच्या घरी यायची. ती शांतपणे आत खोलीमध्ये यायची. माझ्या मांडीवर बसायची आणि तिथेच तासनतास झोपायची. कालांतराने, माझ्या आयुष्याच्या त्या टप्प्यात ती माझी सर्वात जवळची सोबती बनली आणि तेव्हाच मी खऱ्या अर्थाने मांजरांच्या प्रेमात पडलो, असे त्याने म्हटले. आश्चर्याची बाब म्हणजे, मुंबईतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या मांजरांची वेबसाईट बनविणाऱ्या सुदर्शनकडे अजूनही मांजर नाही.