Diploma Admissions | पदविका प्रवेशात मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिलचा बोलबाला Webcoir
मुंबई

Diploma Admissions | पदविका प्रवेशात मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिलचा बोलबाला

एआयमुळे स्वरूप बदलत असताना पारंपरिक अभ्यासक्रमाला महत्त्व; गेल्यावर्षीच्या तुलनेत ४,९४० विद्यार्थ्यांचे प्रवेश जास्त

पुढारी वृत्तसेवा

पवन होन्याळकर

मुंबई : एआयमुळे नोकऱ्यांचे स्वरूप बदलत असताना आणि कॉम्प्युटर क्षेत्रातील रोजगारासाठी प्रचंड स्पर्धा वाढत असूनही दहावीनंतर यंदा विद्यार्थ्यांनी पारंपरिक अभ्यासक्रमाला महत्त्‍व दिले आहे. ‘कॉम्प्युटर’पेक्षा ‘मशिन’, ‘कोडिंग’पेक्षा ‘इलेक्ट्रिकल’ आणि आयटीपेक्षा बांधकाम क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा कल दिसला आहे. यंदाच्या पदविका अभियांत्रिकी प्रवेशात मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल या तीन पारंपरिक शाखांमध्ये तब्बल ५७,१५४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. गेल्यावर्षीच्या तुलनेत या शाखांच्या प्रवेशात तब्बल ४,९४० विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे. दुसरीकडे, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमधील प्रवेश मात्र १,५३९ ने घटले आहेत.

यंदा १ लाख ४० हजार ९३९ दहावीच्या विद्यार्थ्यांनी पदविका अभियांत्रिकी प्रवेशासाठी अर्ज केला. यामध्ये ९३ हजार ५४२ मुले आणि ४७ हजार ३९७ मुली होत्या. यापैकी ७६ हजार २६६ मुलांनी, तर ३८ हजार ३०७ मुलींनी यंदा प्रवेश घेतला आहे. विशेष म्हणजे, ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या तब्बल ६ हजार ७९९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्यातील ४४९ तंत्रनिकेतन संस्थांमध्ये यावर्षी १ लाख ३९ हजार १४७ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी १ लाख १४ हजार ५६१ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. गेल्या दहा वर्षांतील हा उच्चांक आहे. यंदा ३१ हजार ९४५ जागा रिक्त राहिल्या आहेत.

एआय आणि आयटी क्षेत्रातील नोकरीच्या बदलत्या संधींमुळे संगणक शाखांकडे विद्यार्थ्यांची धाव सुरू असतानाच, यंदाच्या पदविका अभियांत्रिकी प्रवेशात मात्र पारंपरिक अभियांत्रिकी शाखांनी पुन्हा आपली ताकद दाखवली आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगला तब्बल २३ हजार ४७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेत सर्व शाखांमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. त्यापाठोपाठ कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये १९ हजार ३६६, इलेक्ट्रिकलमध्ये १७ हजार ८३५ आणि सिव्हिलमध्ये १६ हजार २७२ प्रवेश झाले आहेत. विशेष म्हणजे, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल या तीन पारंपरिक शाखांमध्येच प्रवेशाच्या जवळपास निम्मा वाटा या शाखांचा आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखेत २० हजार ४२३ मुले आणि २ हजार ६२४ मुली, अशा एकूण २३ हजार ४७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. गेल्यावर्षी मेकॅनिकलमध्ये २० हजार ५९३ प्रवेश झाले होते. म्हणजे यंदा या शाखेतील प्रवेशात २ हजार ४५४ विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे.

नव्या अभ्यासक्रमांनाही प्रतिसाद

उद्योगातील नव्या तंत्रज्ञानाची गरज लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांनाही विद्यार्थ्यांनी पसंती दिली. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशिन लर्निंगमध्ये ६ हजार ८१५, माहिती-तंत्रज्ञानात ४ हजार २९४, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये ३ हजार ७८ आणि कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये २ हजार ५२८ प्रवेश झाले आहेत. विशेष म्हणजे, एआय अँड मशिन लर्निंगमध्ये ३ हजार ५०८ मुलींनी, तर ३ हजार ३०७ मुलांनी प्रवेश घेतला. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्येही मुलींची संख्या मुलांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाशी संबंधित अभ्यासक्रमांमध्ये मुलींचा सहभाग वाढला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT