मुंबई : गेल्या तीन वर्षांत वेगवेगळ्या राज्यांत एमडी ड्रग्ज कारखाने सुरू करून एमडी ड्रग्जची विक्री प्रकरणातील सलमान सलीम शेख ऊर्फ शेरा या मुख्य आरोपीस दुबईहून अटक करून त्याचे प्रत्यार्पण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येताच त्याला घाटकोपर युनिटच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली.
शेरा ड्रग्जच्या चार वेगवेगळ्या गुन्ह्यांत वॉण्टेड आरोपी आहे. दुबईतून शेरा हा एमडी ड्रग्जची सर्व सूत्रे हलवत होता, त्यामुळे त्याच्या अटकेसाठी मुंबई पोलिसांनी रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. ऑगस्ट २०२२ रोजी एमडी ड्रग्जप्रकरणी घाटकोपर युनिटच्या अधिकाऱ्यांनी एक कारवाई केली होती. याच गुन्ह्यांत चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन कोटी रुपयांचे ९९५ ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि सव्वा लाखांची कॅश जप्त केली होती. त्यांच्या चौकशीतून या गुन्ह्यांत सलमान शेख ऊर्फ शेरा याचे नाव समोर आले होते. चौकशीदरम्यान शेरा हा ड्रग्ज तस्करीचा म्होरक्या असून तो दुबईत वास्तव्यास असल्याची माहिती प्राप्त झाली होती.
दुबईत राहून तो वेगवेगळ्या राज्यात एमडी ड्रग्ज कारखाने सुरू करून ड्रग्जची निर्मिती करून आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने विक्री करत होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी मुंबई पोलिसांनी रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. गेल्याच आठवड्यात त्याला दुबईतून अटक करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध भारतातील विविध पोलीस ठाण्यांत ड्रग्जसंबंधित गुन्हे असल्याने त्याला भारताच्या स्वाधीन करण्यात आले होते. रविवारी त्याला दुबईहून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले होते. यावेळी त्याचा ताबा घाटकोपर युनिटकडे सोपवण्यात आला. दहा वर्षांपूर्वी त्याला डोंगरी पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून पोलिसांनी साडेनऊ लाखांचे ४७ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. याच गुन्ह्यांत नंतर त्याला जामीन मंजूर झाला होता. जामिनावर बाहेर येताच तो पळून गेला होता. त्यानंतर त्याचा चार वेगवेगळ्या ड्रग्जच्या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. घाटकोपर युनिटच्या युनिटने २०२३ साली काही ड्रग्जसहीत आरोपींना अटक केली होती. या आरोपींकडून पोलिसांनी ७२ लाख ६२ हजारांचा चरस, केटामाईन आणि एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता.
२०२४ रोजी अकोलाच्या बार्शी टाकली पोलिसांनी एका ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश केला होता. या कारखान्यातून ५५४८ ग्रॅम वजनाचे इपिड्राईनचा साठा जप्त केला होता. त्याची किंमत १ कोटी ३८ लाख ७० हजार रुपये इतकी होती. त्याच वर्षी तेलंगणाच्या बीबीनगर पोलिसांनी अन्य एका ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश केला होता. या कारवाईत पोलिसांनी २३ कोर्टीचा ११० एमडी ड्रग्ज आणि १० किलो अल्फ्राझोलमचा साठा जप्त केला होता. त्यानंतर अलीकडेच साकीनाका पोलिसांनी म्हैसर येथून एमडी ड्रग्ज बनविणाऱ्या कारखान्यात कारवाईत केली होती. या कारवाईत पोलिसांनी ४६ कोटींच्या १८० किलो एमडी ड्रग्जसहीत ड्रग्जसाठी लागणारे साहित्य जप्त केले होते. या चारही गुन्ह्यांत शेर याचा सहभाग उघडकीस आला होता.
दुबईत वास्तव्यास असताना त्याने तिथे एमडी ड्रग्ज कारखाने सुरू करून कारखान्यात तयार होणारा एमडी ड्रग्जची आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने विक्री केली होती. या ड्रग्जचे संपूर्ण पैसे त्याला दुबईत पाठविले जात होते. गेल्या तीन वर्षांत त्याने ड्रग्जच्या तस्करीतून कोट्यवधी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे त्याला याच चारही गुन्ह्यांत पोलिसांकडून अटक केली जाणार आहे.