मुंबई: टीईटी परीक्षा पेपरफुटीप्रकरणी दोषींवर संघटित गुन्हेगारी कायदा (मोका) अंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत कायद्यामध्ये सुधारणा करण्यात येईल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली.
फेरपरीक्षा पारदर्शक पद्धतीने व शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यात येईल, फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही, पुढील वर्षापासून टीईटी व अन्य सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पार पाडण्याकरिता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पोलिस सह आयुक्त (गुन्हे), ठाणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करून त्यांच्याकडे टीईटी पेपरफुटीचा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. गुन्ह्याच्या तपासासाठी बिहारला २ पथके, हरियाणाला १ पथक व दिल्लीला १ पथक रवाना करण्यात आले आहे, अशी माहिती भुसे यांनी दिली.