मुंबई: वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा वेळ, खर्च आणि वारंवार होणारा प्रवास टाळण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय समुपदेशन समिती (एमसीसी) आणि राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (एनएमसी) मोठा निर्णय घेतला आहे.
२०२६ च्या प्रवेश प्रक्रियेपासून अखिल भारतीय कोट्यातील विद्यार्थ्यांना ‘फ्रीज’ आणि ‘फ्लोट’ हे दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले असून, जागा सुधारणेसाठी (अपग्रेडेशन) प्रत्यक्ष महाविद्यालयात जाण्याची सक्ती रद्द करण्यात आली आहे.
एमबीबीएस, बीडीएस आणि बीएस्सी नर्सिंगच्या अखिल भारतीय कोट्यातील १५ टक्के जागा, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या ५० टक्के जागा तसेच डीम्ड विद्यापीठांमधील १०० टक्के जागांसाठी एमसीसीमार्फत समुपदेशन प्रक्रिया राबविली जाते.
आतापर्यंत प्रवेश घेणे, जागा सुधारणे किंवा प्रवेश रद्द करणे या प्रत्येक टप्प्यासाठी विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रांसह संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागत होते. त्यामुळे प्रत्येक फेरीत विद्यार्थ्यांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करावा लागत होता.
ही अडचण दूर करण्यासाठी एनएमसीने प्रवेश प्रक्रियेत डिजिटल प्रणालीचा अधिक व्यापक वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी ‘फ्रीज’ आणि पुढील फेरीत अधिक चांगल्या महाविद्यालयासाठी प्रयत्न सुरू ठेवण्यासाठी ‘फ्लोट’ हे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांना पसंतीचे महाविद्यालय मिळाल्यास आणि पुढील फेरीत सहभागी व्हायचे नसेल, तर त्यांनी ‘फ्रीज’ पर्याय निवडून प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन अंतिम प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे. मात्र जागा सुधारणेची इच्छा असल्यास ‘फ्लोट’ पर्याय निवडता येणार आहे.
या पर्यायामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात न जाता आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करता येतील. कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तात्पुरते प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाईल. तात्पुरते प्रवेशपत्र तयार होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना त्यांची संमती बदलण्याचाही पर्याय देण्यात आला आहे.
याशिवाय प्रवेश रद्द करण्यासाठीही ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून संबंधित महाविद्यालय ऑनलाइन पद्धतीने अर्जावर निर्णय घेईल. भारतीय नागरिकत्वातून एनआरआय श्रेणीत रूपांतर करण्याची प्रक्रिया देखील पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे. कागदपत्रे सादर करणे, त्यांची पडताळणी आणि प्रवेश शुल्काची नोंदही आता डिजिटल प्रणालीद्वारे होणार असल्याने संपूर्ण प्रवेश प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ होणार आहे.
राज्य कोट्यातील प्रवेश प्रक्रियेत सरकारीबरोबरच खासगी महाविद्यालयांच्या जागांचाही समावेश असल्याने या प्रक्रियेत ‘फ्रीज’ आणि ‘फ्लोट’ पर्याय लागू करण्यात येणार नाहीत. त्यामुळे हे बदल केवळ एमसीसीमार्फत होणाऱ्या अखिल भारतीय कोट्यातील प्रवेश प्रक्रियेलाच लागू राहतील, अशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
‘फ्रीज’ आणि ‘फ्लोट’ म्हणजे काय?
फ्रीज : मिळालेली जागा अंतिम मान्य करून पुढील फेरीत सहभागी न होण्याचा पर्याय. अंतिम प्रवेशासाठी महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागेल. फ्लोट : मिळालेली जागा कायम ठेवत पुढील फेरीत अधिक पसंतीच्या महाविद्यालयासाठी संधी राखून ठेवण्याचा पर्याय. या प्रक्रियेसाठी महाविद्यालयात जाण्याची गरज नाही; कागदपत्रे आणि संमती ऑनलाइन देता येईल.