मुंबई

MCA Election 2025 : जितेंद्र आव्हाड उपाध्यक्षपदी; मिलिंद नार्वेकर सदस्यपदी कायम, पवार- शेलार गट १६ पैकी १२ जागांवर विजयी

Mumbai Cricket Association : सचिवपदी डॉ. उन्मेष खानविलकर आणि खजिनदारपदी अरमान मलिक विजयी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) कार्यकारी समितीच्या त्रैवार्षिक (२०२५- २८) निवडणुकीमध्ये शरद पवार व आशीष शेलार गटाने १६ पैकी १२ जागा मिळवून वर्चस्व राखले. उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून शिवसेना उबाठा गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर निवडून आले. सचिवपदी डॉ. उन्मेष खानविलकर आणि खजिनदारपदी अरमान मलिक यांनी विजयी झाले तर सहसचिवपदी विरोधी गटाच्या नीलेश भोसले यांनी बाजी मारली.

वानखेडे स्टेडियममधील एमसीए लाउंज येथे झालेल्या निवडणुकीत बुधवारी जितेंद्र आव्हाड यांनी नवीन शेट्टी यांच्याविरुद्ध १४६ मतांनी विजय मिळवला. पहिल्या फेरीत आव्हाड यांनी ८७-६० अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या फेरीत (१६६-१२८) त्यांनी आघाडी राखली आणि तिसऱ्या फेरीअखेर मोठ्या फरकाने निवडून आले.

सचिव पदासाठीच्या निवडणुकीत पहिल्या फेरीत डॉ. उन्मेष खानविलकर हे शाहआलम शेख यांच्याविरुद्ध ५१ (९९-४८) मतांनी आघाडीवर होते. दुसऱ्या फेरीत ९४ अधिक मते घेत ९९ मतांनी विजय मिळवला.

सहसचिवपदी नीलेश भोसले यांनी बाजी मारली. त्यांनी गौरव पय्याडे यांचा १०८ मतांनी पराभव केला. पहिल्या फेरीत नीलेश भोसले यांनी (९९) गौरव पय्याडे यांच्याविरुद्ध (४९) मोठी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत ८६ मतांच्या फरकासह विजय नक्की केला. भोसले यांना एकूण २२८ मते पडली.

खजिनदार पदासाठीच्या निवडणुकीत अरमान मलिक यांनी सुरेंद्र शेवाळे यांच्यावर २३४-११९ अशी ११५ मतांनी मात केली. मलिक हे पहिल्या फेरीत ९०-५५ आणि दुसऱ्या फेरीत १८९-१०२ असे आघाडीवीर होते.

कार्यकारिणी सदस्यसाठीच्या ९ जागांसाठी २० जण रिंगणात होते. त्यात आमदार मिलिंद नार्वेकर (२१४ मते) यांच्यासह संदीप विचारे (२४७) सूरज समत (२४६), विघ्नेश कदम (२४२), भूषण पटेल (२०८), नदीम मेमन (१९८), विकास रेपाळे (१९५), प्रमोद यादव (१८६) आणि नील सावंत (१७८ मते) निवडून आले. यामध्ये नार्वेकर, विचारे, कदम, रेपाळे, यादव, समत हे पवार-शेलार ग्रुप पुरस्कृत होते.

तत्पूर्वी, ३७८ पैकी ३६२ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. अनेक दिग्गजांनी मतदान केले. त्यात ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, आमदार जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर, प्रसाद लाड, नाना पटोले, आदिती तटकरे, आशीष शेलार, आदित्य ठाकरे तसेच माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, संजय मांजरेकर, वसीम जाफर तसेच तेजस ठाकरे आदींचा समावेश होता.

अजिंक्य यांच्या निवडीला स्थगिती देण्यास नकार

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आलेल्या अजिंक्य नाईक यांच्या निवडीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला.

कुलिंग पीरियडच्या नियमानुसार, अजिंक्य यांच्याविरोधात कोर्टात याचिका दाखल केलेली याचिका शहर दिवाणी न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. पण हायकोर्टाने उमेदवारीला स्थगिती देण्यास नकार देत पुढील सुनावणी ५ डिसेंबरपर्यंत तहकूब केली. एमसीए निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली तरी सदर निकाल हा हायकोर्टाच्या अंतिम निर्णयाला अधीन राहून असणार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले.

अजिंक्य यांनी २०२९ पासून एमसीएच्या एपेक्स कौन्सिलमध्ये सलग दोन कार्यकाळ (टर्म) पूर्ण केला होता. पण एमसीएच्या नियमानुसार त्यांना कुलिंग ऑफ कालावधी गरजेचा असल्याचा दावा करण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT