MCA Canteen Food Safety Pudhari
मुंबई

MCA Canteen Food Safety: खेळाडूंना ‘मांसाहारी चहा’ पीत असल्याची कल्पना आहे का? हायकोर्टाकडून एमसीएची कानउघाडणी

एफडीएला उपाहारगृहांची नव्याने तपासणी करण्याचे निर्देश दिले.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

वांद्रे-कुर्ला संकुलातील मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) क्लबच्या उपाहारगृहांमधील अस्वच्छ परिस्थितीवर उच्च न्यायालयाने मंगळवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. उपाहारगृहांत माश्या आणि झुरळे आहेत. खेळाडूंना आपण 'मांसाहारी चहा' पीत आहोत, याची कल्पना आहे का? असा उपरोधिक टोला लगावत न्यायालयाने मुंबई क्रिकेट असोसिएशनची कानउघाडणी केली आणि एफडीएच्या कारवाईचे समर्थन केले. तसेच एफडीएला उपाहारगृहांची नव्याने तपासणी करण्याचे निर्देश दिले.

एमसीएच्या ५ उपाहारगृहांचा परवाना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) निलंबित केला आहे. या कारवाईविरोधात एमसीएने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर मंगळवारी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गाैतम अंखड यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने एमसीएचे कान उपटत एफडीएच्या कारवाईचे समर्थन केले. तसेच एमसीएला गुरुवारी एफडीए अधिकाऱ्यांकडून तपासणी होण्यापूर्वी आपल्या उपाहारगृहांची जागा स्वच्छ करण्याचे निर्देश दिले. सुनावणीवेळी एमसीएच्या वकिलांनी उपाहारगृहे बंद असल्याने क्रिकेटपटूंना चहाही मिळत नसल्याचा युक्तीवाद केला. त्याची नोंद घेतानाच खंडपीठाने 'मांसाहारी चहा' अशी मिश्किल टिप्पणी केली. एमसीएने गुरुवारच्या आत आपली सर्व उपाहारगृहे पूर्णपणे स्वच्छ करावीत, गुरुवारच्या स्वच्छतेनंतर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सर्व उपाहारगृहांची नव्याने तपासणी करावी, असे निर्देश देत खंडपीठाने खेळाडूंना चहा-कॉफी देण्यासाठी एमसीएला तात्पुरते व्हेंडिंग मशीन बसवण्याची परवानगी दिली. तसेच स्वच्छता आणि त्रुटींची पूर्तता झाल्यावर उपाहारगृहांचे निलंबन तातडीने मागे घेण्याचे निर्देश एमसीएला देत खंडपीठाने पुढील सुनावणी २९ ऑगस्ट रोजी निश्चित केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT