MBBS Admission Pudhari
मुंबई

MBBS BDS Admission: यंदा बनावट कागदपत्रांचा धोका टळणार; नोंदणीवेळी होणार कागदपत्रे ऑनलाइन अपलोड

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत सुधारणा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: वैद्यकीय एमबीबीएस आणि बीडीएस या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा नोंदणीवेळीच आपली कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करावी लागणार आहेत. विशेष म्हणजे या एका नियमामुळे बनावट उमेदवारांचा धोका जवळपास संपूर्णपणे टळणार असल्याची खात्री राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने व्यक्त केली.

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत यंदापासून मोठा बदल करण्यात आला आहे. या कागदपत्रांची पडताळणीही सॉफ्टवेअरद्वारे होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बनावट कागदपत्रे दाखल केल्यास ती नोंदणी प्रक्रियेतच पकडली जातील.

गेल्या वर्षी राज्यात एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेदरम्यान ऑक्टोबर २०२५ मध्ये परराज्यातील १५१ ते १५२ विद्यार्थ्यांनी बनावट ई-मेल आणि कागदपत्रांचा वापर करून अर्ज केल्याचे उघडकीस आले. सीईटी कक्षाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत संशयित विद्यार्थ्यांवर कारवाई करत त्यांना प्रवेश प्रक्रियेतून बडतर्फ केले होते.

अनेकदा एखाद्या विद्यार्थ्याला एखादे महाविद्यालय अलॉट झाल्यावर तो तिथे प्रवेश घ्यायला गेल्यावर त्याच्याकडे काही कागदपत्रे नसल्याचे कारण देत प्रवेश नाकारत होते. एखाद्या विद्यार्थ्याला प्रवेश नाकारून त्या जागी दुसऱ्या विद्यार्थ्याची वर्णी लावल्याच्या तक्रारीही सीईटी कक्षाकडे आल्या होत्या.

पण आता सर्व कागदपत्रे आधीच ऑनलाइन अपलोड झाली असतील, तर विद्यार्थ्यांना महाविद्यालयांकडून या कारणामुळे प्रवेश नाकारण्याचे प्रकार घडणारच नाही, असा विश्वासही सीईटी सेलकडून व्यक्त केला आहे.

कट-ऑफसाठी यंदाही चुरस कायम

गेल्या वर्षी पहिल्या फेरीत मुंबईतील जीएस मेडिकल कॉलेज (केईएम)मध्ये खुल्या प्रवर्गाचा शेवटचा प्रवेश ५८७ गुणांवर झाला होता. टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज (सायन)मध्ये ५६७, बी. जे. मेडिकल कॉलेज, पुणे येथे ५५९, ग्रँट मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल मेडिकल कॉलेज, मुंबई येथे प्रत्येकी ५५६, एचबीटी अँड कूपर मेडिकल कॉलेजमध्ये ५५५, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे ५५१, राजीव गांधी मेडिकल कॉलेज, कलवा येथे ५५०, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे ५३७, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक येथे ५३१ गुणांवर प्रवेश बंद झाला होता.

बीडीएस अभ्यासक्रमासाठी मुंबईच्या शासकीय दंत महाविद्यालयात खुल्या प्रवर्गाचा शेवटचा प्रवेश ४८२ गुणांवर, नायर दंत महाविद्यालयात ४७४, छत्रपती संभाजीनगर येथे ४६७, नागपूर येथे ४६५ आणि जळगाव येथे ४५४ गुणांवर झाला होता. त्यामुळे यंदाही सरकारी वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांतील प्रवेशासाठी यावर्षी मोठी स्पर्धा राहणार आहे.

असे आहे वेळापत्रक...

  • ऑनलाइन नोंदणी - ६ ते १२ ऑगस्ट

  • नोंदणी शुल्क भरणे - ६ ते १३ ऑगस्ट

  • कागदपत्रे अपलोड - ६ ते १३ ऑगस्ट

  • कागदपत्र पडताळणी - ७ ते १४ ऑगस्ट

  • तात्पुरती गुणवत्ता यादी - १५ ऑगस्ट

  • हरकती नोंदविणे - १६, १७ ऑगस्ट

  • अंतिम गुणवत्ता यादी व सीट मॅट्रिक्स - १८ ऑगस्ट

  • ऑनलाइन पसंतीक्रम भरणे - १९ ते २२ ऑगस्ट

  • प्रवेश यादी - २३ ऑगस्ट

  • महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे - २४ ते २८ ऑगस्ट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT