Mumbai Mazgaon Ganpati Row  Pudhari
मुंबई

Ganpati Procession Egg Throwing Case: माझगावच्या मोरया मिरवणुकीवर अंडी फेकणार्‍या तरुणाला ३६ तासांत अटक

Mumbai Mazgaon Ganpati Row: परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तातडीने अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला होता.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: माझगावच्या ‘मोरया गणपती’च्या आगमन मिरवणुकीवर अंडी फेकणार्‍या तरुणाचा ३६ तासांत भायखळा पोलिसांनी छडा लावला असून, दानिश शेर खान (२२) याला अटक केली आहे.

२३ ऑगस्टच्या रात्री ‘माझगावचा मोरया गणेशोत्सव मंडळा’ची गणेशमूर्ती आगमन मिरवणूक मंडपाच्या दिशेने जात असताना कॉन्टिनेन्टल हाइट्स इमारतीच्या दिशेने अंडी फेकण्यात आली.

यातील एक अंडे गणेशमूर्तीवर पडल्याने गणेशभक्त संतप्त झाले. काही वेळातच मोठी गर्दी जमली. परिसरात तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तातडीने अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला होता.

भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९ आणि १९६ अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी पाच विशेष पथके तयार करून तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अवघ्या ३६ तासांत आरोपीला अटक केली.

दानिशची कबुली

पोलीस उपायुक्त जयंत मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दानिश हा ऑनलाइन ऑर्डरवर अंड्यांची डिलिव्हरी करण्याचे काम करतो. घटनेच्या दिवशी तो माझगावमधील कॉन्टिनेन्टल हाइट्स इमारतीत अंड्यांची ऑर्डर पोहोचवण्यासाठी गेला होता. त्यावेळी सोसायटीबाहेर फटाके फोडले जात होते.

फटाक्यांच्या धुरामुळे त्याच्या डोळ्यांना त्रास झाला आणि त्याला व्यवस्थित चालताही येत नव्हते. या कारणामुळे संतापलेल्या दानिशने गणेशमूर्तीच्या आगमन मिरवणुकीच्या दिशेने अंडी फेकली अशी स्पष्ट कबुली दिली. आता पुढील कारवाईकडे गणेशभक्तांचे लक्ष आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT