कांदिवली : बोरीवलीचे आ. संजय उपाध्याय यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण बोरिवलीत मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. सिग्नल चौक, नाके, विजेचे खांब, सुशोभीकरण केलेले चौक पदपथावर, स्काय वॉक, पादचारी पूल आणि दुभाजकांमध्ये शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरबाजीमुळे बोरिवलीच्या विद्रुपीकरणात भर पडली आहे. याकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने नागरिकांसह प्रवासी व वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
राजकीय पक्षांकडून सुंदर व स्वच्छ मुंबइ साठी विविध उपक्रम राबवले जातात. मात्र बॅनरबाजीमध्ये राजकीय पक्षांचे सर्वाधिक बॅनर असतात. बोरीवली आर / मध्य विभागाने स्टेशन परिसर फेरीवालामुक्त केला आहे. यात आमदार संजय उपाध्याय यांनी स्वतः पुढाकार घेऊन मार्ग मोकळे केले आहेत.
अतिक्रमण विभागाची वाहने उभी केली आहेत, यामुळे बोरिवलीकर नागरिकांसह प्रवासी आणि वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र बॅनरबाजीवर अद्याप ठोस पावले उचलण्यात आली नसल्याने सर्वच विभागात बॅनरबाजीमुळे विद्रुपीकरण होत आहे.
लाखो रुपये खर्च करून सुशोभीकरण केलेल्या चौकातही बॅनर लावण्यात आले आहेत. सिग्नल चौकात बॅनरबाजीमुळे काही सिग्नल दिसत नाहीत. पदपथावर बॅनर वाकडे तिकडे होतात, फाटतात, पडतात लाकडी फ्रेम रस्त्यावर पडल्याने बऱ्याचदा अपघाताची शक्यता निर्माण होते.
आ. संजय उपाध्याय यांचा २८ मे रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या चाहत्यांनी, पाच सहा दिवस अगोदरच शुभेच्छांच्या बॅनरचा वर्षाव केला आहे. बोरिवलीतील बहुतांशी चौक, नाके, दुभाजक, पदपथ, उड्डाणपूल, स्कायवॉक, विजेचे खांब यावर बॅनर झळकत आहेत. यामुळे कुंपणानेच शेत खाल्ल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. बॅनरबाजीसाठी महापालिकेने तसेच राज्य सरकारने ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचे, पर्यावरण प्रेर्मीसह नागरिकांकडून बोलले जात आहे.