मुंबई ः नाणेनिधीकडून कोट्यवधीचे कर्ज व निधी मंजूर होताच पाकिस्तानने दहशतवादी संघटनांवर दौलतजादा करण्यास सुरुवात केली असून, भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या कायदेशीर वारसांना प्रत्येकी एक कोटी रुपये देण्याची घोषणा पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केली आहे. संयुक्त राष्ट्राने दहशतवादी म्हणून घोषित केलेला भारताचा दुष्मन व जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याला एकट्यालाच 14 कोटी रुपये मिळणार असल्याचे वृत्त आहे.
7 मे रोजी भारताने पाकिस्तानविरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’ पुकारले आणि पहिल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात लाहोर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केले. यात बहावलपूरमधील सुभानअल्लाह तळ हे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय जमीनदोस्त झाले. यात मसूद अझहरचे 14 कुटुंबीय ठार झाल्याचा दावा खुद्द मसूदने केला. अख्खे कुटुंब ठार झाल्याने छाती बडवत मसूद रडला. ‘मी मेलो असतो तर बरे झाले असते,’ असे तो म्हणाला होता. मसूदने जारी केलेल्या पत्रानुसार, ठार झालेल्यांमध्ये त्याची बहीण, त्याचा मेहुणा, भाचा, भाची आणि अन्य सदस्य होते. याचा अर्थ भारताच्या क्षेपणास्त्राने खतरनाक मौलाना?म्हणून कुख्यात असलेल्या मसूद अझहरचे अख्खे कुटुंबच ठार केले. कुटुंबाचा एकमेव वारस कुणी उरला असेल तर तो एकटा मसूद. भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ठार झालेल्या त्याच्या कुटुंबातील सदस्यांमागे एक कोटी याप्रमाणे मसूदला आता पाक सरकारकडून 14 कोटी रुपये मिळतील.
पाक पंतप्रधान शरीफ यांनी घोषित केलेल्या पॅकेजनुसार, भारताच्या हल्ल्यात पडलेली घरेही बांधून दिली जाणार आहेत. त्यामुळे ‘जैश’चा सुभानअल्लाह तळदेखील पुन्हा बांधून दिला जाऊ शकतो. 18 एकर परिसरातील या तळावर एक मशीददेखील होती. या तळावर दहशतवाद्यांची भरती, प्रशिक्षण, त्यांची माथी भडकावण्याचे उद्योग मौलाना मसूद करत असे. मसूद बचावला असला, तरी त्याच्या प्रत्येक हालचालीवर भारतीय गुप्तचरांचे बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. उपग्रहांद्वारे हाती आलेल्या ताज्या छायाचित्रांनुसार, भारत-पाकचा युद्धविराम होताच मौलाना मसूदने बहावलपूरच्या तळावर पुन्हा ठाण मांडले आणि आपल्या कारवाया सुरू केल्या.
भारताने कडाडून विरोध करूनही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला 1.2 अब्ज डॉलरचे कर्ज मंजूर केले आणि ही रक्कम शुक्रवारीच, 16 मे रोजी स्टेट बँक ऑफ पाकिस्तानमध्ये जमा होईल. याशिवाय 1.4 अब्ज डॉलरचा निधीदेखील नाणेनिधीने पर्यावरणीय बदल आणि आपत्तींचा सामना करण्यासाठी पाकला मंजूर केला आहे. पाकिस्तानची मध्यवर्ती बँक असलेल्या ‘एसबीपी’ म्हणजेच स्टेट बँक ऑफ पाकिस्ताननेच हा तपशील ‘एक्स’ या पूर्वाश्रमीच्या ट्विटरवर जाहीर केला. पाकिस्तानला हे कर्ज आणि निधी देऊ नका. हा संपूर्ण पैसा पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी वापरण्याची शक्यता आहे, असा संशय व्यक्त करत भारताने नाणेनिधीत झालेल्या मतदानावर बहिष्कार टाकला होता. भारताचा हा संशय आता खरा ठरला आहे.