मुंबई : पूर्वीच्या काळी मुलगी लग्नाच्या वयात आली की आई-बापाच्या जिवाला घोर लागायचा. आता परिस्थिती उलट आहे. मुलाच्या आई-वडिलांनाच सून शोधण्यासाठी दाहीदिशा हिंडावे लागत आहे. त्यात लग्न जुळलेच तर दागिने परवडेनात, हॉल आणि जेवणाचा खर्चही झेपेना. त्यामुळे मुलामुलींचे विवाह आई-वडिलांची झोप उडवत आहेत.
लोकसंख्येचा विचार करता राज्यात मुलींची संख्या खूपच कमी आहे. वंशाचा दिवा मुलगाच हवा, ही प्रवृत्ती अजूनही संपलेली नाही. कायद्याने लिंग निदानाला बंदी असली तरी अजूनही स्त्रिच्या पोटातील गर्भाचे निदान करून तो गर्भ स्त्रीचा असल्यास गर्भपात करून नष्ट करण्यात येण्याचे प्रकार छुप्या पद्धतीने सुरूच आहेत.
आम्ही लग्नाळू
अलीकडे राज्यात साधारणपणे एक हजार मुलांमागे ८७० ते ९५० च्या दरम्यान मुलींचा जन्मदर राहिला आहे. मुलींचा जन्मदर सातत्याने कमी होताना दिसत आहे. नागपूर आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये तो ९०० पर्यंत आहे. मुंबईमध्ये तो ९१४ च्या आसपास आहे. त्यामुळे ३५ ते ४० चे वय झाले तरी बाशिंग गुडघ्यालाच अशी मुलांची स्थिती आहे.
मुलगी न मिळण्यामागे त्यात आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे मुली खूप शिकतात आणि मोठी पॅकेज मिळवतात. बहुसंख्य मुलांची गाडी मात्र पदवीपर्यंतच अडकते. मग पंचवीस ते तीस हजार पगारावरच त्यांना समाधान मानावे लागते. त्याचवेळी त्यांच्या वयाच्या मुली मात्र ६० ते ७० हजारपेक्षा जास्त पॅकेज घेतात.
त्यातही समजा मोठ्या मनाने मुलीकडच्यांनी लग्नाला तयारी दर्शवलीच तर दागिने परवडत नाहीत. लग्न म्हटले की साडेतीन तोळ्याचे मंगळसूत्र, अर्ध्या तोळ्याची अंगठी, अर्धा तोळ्याच्या कानातल्या रिंगा. राहिली नाकातली नथ. पण, आपल्याकडे अनेक भागांत वडील मुलीचे नाक कधी दुसऱ्याच्या हातात जाऊ देत नाहीत. म्हणजे नाही म्हटले तरी साडेचार तोळे सोने आलेच.
आजचा सोन्याचा भाव पाहता हा आकडा नवरदेवाच्या वडिलांच्या डोक्यावरून जातो. त्यात हॉलचे भाडे वेगळे. जेवणाचे एक ताट ७०० ते १२०० रुपयांच्या खाली नाही. तिथेही हॉलवाल्यांची मोनोपॉली. दोन्हीकडची मिळून पाचशे ताटे पकडली तरी सहा लाख होतात. बाकी कपडालत्ता, मानपान आलेच. त्यातही आता साखरपुडा आणि हळदीचा खर्च लग्नाईतका करण्याची फॅशन आली. मग कसे परवडणार लग्न ?
आम्ही जेव्हा वधू-वर मेळावे भरवतो त्यावेळी नोंदणीसाठी मुलींची संख्या फारच कमी असते. लग्नासाठी मुलगी मिळण्याबरोबरच लग्नाच्या खर्चामध्ये सोन्याचे दर हा आणखी एक मोठा अडसर ठरत आहे. त्यामुळे वनग्रॅम गोल्डचे दागिने हा त्यावर उत्तम पर्याय ठरू alys शकतो. दोन्हीकडील मंडळींनी समजून घेतले तर खूप कमी खर्चात लग्न होतील. आम्ही त्यादृष्टीने जनजागृती करणार आहोत. नाहीतरी अलीकडे अगदी मोठ्या शहरांमध्येही सुरक्षेच्या कारणास्तव कोणी खरे दागिने घालून बाहेर पडत नाही.डॉ. सुवर्णा पवार, मुंबई अध्यक्षा, महिला मराठा महासंघ
सोन्याचे दर
प्रति १० ग्रॅम १ लाख ४५ हजार
चांदीचा दर
प्रति १ किलोग्रॅम २ लाख ५५ हजार
घडणावळ
१८ टक्के अधिक जीएसटी (३%)