मुंबई : न्यू माहिम शाळेच्या बांधकामाला धोकादायक ठरवून पालिकेने सदर शाळा बंद करण्याचा घाट घातला असताना आता भांडुपमध्ये 1971 सालापासून सुरू असलेल्या खिडींपाडा येथील महानगर पालिकेची मराठी शाळा बंद झाली आहे. त्यामुळे या शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यांना नाईलाजस्तव खासगी शाळेत प्रवेश घ्यावा लागल्याचे वास्तव समोर आले आहे.
शाळा धोकादायक घोषित झाल्यानंतर ही शाळा मूळ ठिकाणापासून 3 किमी अंतरावर असलेल्या तूळशेत पाडा या शाळेत स्थलांतरीत करण्यात आली. शाळेत बालवाडीसह 80 विद्यार्थी अध्ययन करत होते. मात्र, एवढ्या दूर पाठवण्यासाठी वाहतूक व्यवस्था नसल्याने पालकांनी विद्यार्थ्यांना खासगी शाळेत शिक्षणासाठी पाठवले. परिणामी, विद्यार्थीच नसल्याने खिंडीपाडा मनपा मराठी शाळा बंद झाली.
या प्रकरणी राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाहक शिवनाथ दराडे यांनी आमदार संजय उपाध्याय यांना 24 जुलै रोजी पत्रव्यवहार करत संबंधित शाळेची पुनर्बाधणी तातडीने पूर्ण करून शाळा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली होती. यानुसार आमदार उपाध्याय यांनी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र पाठवून खिंडीपाडा परिसरातील गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय करण्याची विनंती केली.
शाळा जीर्णवस्थेत असताना महापालिकेच्या कनिष्ठ अधिकार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दुरुस्तीसाठी वारंवार पत्रव्यवहार केल्याचे पत्रात नमूद केले आहे. तसेच, खिंडीपाडा शाळा जीर्ण झाल्यामुळे 2024 मध्ये वर्षभर विद्यार्थी संत निरंकारी सत्संग सभागृहात बसत होते. परंतु शाळेचे ठिकाण शाळेपासून उंच डोंगरावर असल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड पायपीट करत शाळा गाठावी लागत असे. सातत्याने प्रयत्न करूनही महानगरपालिकेने त्या समस्येकडे लक्ष दिले नाही, असेही पत्रात नमुद करण्यात आले आहे.
भांडुप खिंडीपाडा येथे महानगरपालिकेने 1971 साली जिल्हाधिकार्यांच्या जागेत सदर शाळा बांधली होती. पण अनेक वर्षांपासून शाळेची डागडुजी, रंगरंगोटी न झाल्याने इमारत अत्यंत जीर्ण झाली होती. याबाबत अनेक सामाजिक संस्थानी पाठपुरावा करूनही शाळेकडे पालिकेच्या अधिकार्यांनी दुर्लक्ष केल्याने शाळा बंद पडली आहे.संजय उपाध्याय, आमदार