मुंबई : Aadhaar card update | मराठी साहित्यिक, भाषाप्रेमी, राज्य शासन, इत्यादींनी अनेक वर्षे प्रयत्न केल्यानंतर अखेर निवडणुकीच्या तोंडावर का होईना, केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला; पण दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातल्या नागरिकांना स्वतःची ओळख मराठीतून सांगण्याचीही सोय राहिलेली नाही. ओळखीचा पुरावा असणारे आधार कार्ड अद्ययावत केल्यानंतर त्यावरील मराठी भाषेतील माहिती नाहीशी होऊन त्याऐवजी केवळ हिंदी आणि इंग्रजीतूनच माहिती उपलब्ध होत आहे.
भारतातील प्रत्येक नागरिकाच्या ओळखीचा पुरावा आणि निवासी पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्डचा वापर होतो. केंद्र शासनाच्या 'युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी' मार्फत नागरिकांना आधार कार्ड दिले जाते. यात व्यक्तीचे नाव, पत्ता, वय, यांसह हातांचे ठसे, डोळ्यांची प्रतिमा अशी माहिती साठवलेली असते. शिक्षण, नोकरी, बँक खाते, विविध सरकारी योजनांचे लाभ अशा ठिकाणी आधार कार्ड जोडणे अनिवार्य आहे.
आधार कार्ड तयार केल्यानंतर काही कालावधीने त्यातील माहितीचे अद्ययावतीकरण करावे लागते. २०११ साली ही योजना सुरू झाल्यानंतर आजतागायत तयार करण्यात आलेले सर्व आधार कार्ड हे स्थानिक भाषा आणि इंग्रजीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांचे आधार कार्ड हे मराठी आणि इंग्रजीत आहेत; मात्र अलीकडे या नियमात बदल होताना दिसत आहे. आधार कार्डमधील माहिती अद्ययावत केल्यानंतर नव्याने उपलब्ध होणारे आधार कार्ड हे केवळ हिंदी आणि इंग्रजीत असल्याचा अनुभव येत आहे. अनेक ठिकाणी मराठी आणि इंग्रजीत आधार कार्ड मिळवण्याचा पर्याय उपलब्ध आहे; मात्र केंद्र सरकारी संस्थांमध्ये वेगळी परिस्थिती आहे. बैंक ऑफ इंडिया, टपाल खाते या ठिकाणी आधार अद्ययावतीकरणासाठी नेमण्यात आलेले कर्मचारी बऱ्याचदा अमराठी असतात. त्यामुळे मराठीतील माहिती अद्ययावत केली जाणार नाही असे ते सांगतात. (Aadhaar card update)
बायोमेट्रिक अपडेट केल्यानंतर जेव्हा टपालाद्वारे नागरिकांना अद्ययावत आधार कार्ड प्राप्त होते तेव्हा त्यावरून 'अभिजात मराठी' गायब झालेली असते. माहिती केवळ हिंदी आणि इंग्रजीतच उपलब्ध असते. त्यामुळे अभिजात दर्जा मिळालेली राज्यभाषा मराठी हळूहळू सार्वजनिक वापरातून नाहीशी होण्याचा धोका आहे. (Aadhaar card update)
एकीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंदोत्सव सुरू असताना अशा प्रकारची प्रकरणे जर पुढे येत असतील तर हे दुर्दैवी आहे. यामागच्या कारणांचा शोध घेऊन हा भाषेवर होणारा अन्याय थांबवायला हवा.
- सुशील शेजुळे, सदस्य, मराठी अभ्यास केंद्र.