फ्रान्समधील कान्स महोत्सवात यंदा चार मराठी चित्रपट  file photo
मुंबई

फ्रान्समधील कान्स महोत्सवात यंदा चार मराठी चित्रपट

Cannes Film Festival 2025 | 'स्थळ', 'स्नो फ्लॉवर', 'खालिद का शिवाजी' आणि 'जुनं फर्निचर'चा समावेश

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

Cannes Film Festival 2025 | फ्रान्समधील कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी 'स्थळ', 'स्नो फ्लॉवर' आणि 'खालिद का शिवाजी' या तीन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. तर, 'जुनं फर्निचर' या चित्रपटाची विशेष निवड करण्यात आल्याची माहिती दादर येथील पत्रकार परिषदेत राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी रविवारी दिली.

मंत्री शेलार म्हणाले की १४ ते २२ मे दरम्यान फ्रान्समध्ये होणाऱ्या कान्स या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा चार मराठी चित्रपटांची एन्ट्री झाली आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत २०१६ पासून कान्स महोत्सवातील फिल्म मार्केटमध्ये मराठी चित्रपट पाठवले जात आहेत. मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावा आणि जागतिक सिनेप्रेमींना मराठी चित्रपटाची भुरळ पडावी, हा यामागचा हेतू आहे. या चित्रपट निवडीसाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने तज्ज्ञ परीक्षण समिती तयार केली होती. आदित्य सरपोतदार, निखिल महाजन, गणेश मतकरी, इरावती कर्णिक, अपूर्वा शालिग्राम यांचा यात समावेश होता.

स्थळ

ग्रामीण भागातील पारंपरिक अरेंज मॅरेज व्यवस्थेवर भाष्य करणारा 'स्थळ' हा चित्रपट आहे. समाजात खोलवर रुजलेली पितृसत्ताक पद्धत, रंगभेद आणि सामाजिक दृष्टिकोन अशा अनेक गोष्टींवर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे. सचिन पिळगांवकर या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. अभिनेत्री नंदिनी चिकटे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. जयंत सोमलकर यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

स्नो फ्लॉवर

'स्नो फ्लॉवर' या मराठी चित्रपटात मार्मिक, क्रॉसकंट्री कथा सांगणारा आहे. रशिया आणि कोकण या दोन वेगळ्या संस्कृतींना जोडणारा हा चित्रपट आहे. बर्फाळ सायबेरिया आणि हिरवेगार कोकण यांच्या विरोधाभासी पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट आहे. गजेंद्र अहिरे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. विठ्ठल अहिरे, छाया कदम, वैभव मांगले आणि सरफराज आलम सफू हे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

खालिद का शिवाजी

राज मोरे यांच्या 'खालिद का शिवाजी' या चित्रपटात खालिद हा मुलगा मुस्लिम धर्मीय असल्याने त्याला इतर मुलं एकटं पाडतात. त्याचे निरागस डोळे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा शोध घेतात, हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.

जुनं फर्निचर

महेश मांजरेकर अभिनीत आणि दिग्दर्शित 'जुनं फर्निचर' हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे. या चित्रपटात वृद्धापकाळात पोहोचल्यावर आपलीच मुले आपल्याला कशाप्रकारे नाकारतात आणि त्यामुळे होणारे हाल दाखवण्यात आले आहेत. अभिनेता भूषण प्रधान या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. मेधा मांजरेकर, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकारी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT