Manoj Jarange Patil
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण दिलं नसल्याने प्रचंड मोठी वेदना आहे. मुंबईत मराठा बांधवांची केवळ गर्दी झाली आहे, असे सरकारने समजू नये, तर वेदना समजावी. उद्यापासून पाणीही बंद करणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज राज्य सरकारला दिला. ते आझाद मैदानावर पत्रकार परिषदेत बाेलत हाेते.
मराठा मोर्चा आणि आर क्षणाबाबत सर्व गोष्टींची उत्तरे एकनाथ शिंदेच देऊ शकतील. मनोज जरांगे परत का आले याचेही उत्तर एकनाथ शिंदेंना विचारा, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. यावर बोलताना जरांगे म्हणाले की, "दोघे ठाकरे भाऊ आणि ठाकरे बँड चांगला आहे. पण राज ठाकरे विनाकारण मराठ्यांच्या प्रश्नात पडतात. त्यांना ११ ते १३ आमदार निवडून दिले पण ते पळून गेले. लोकसभेला फडणवीसांनी त्यांचा गेम केला. विधानसभेला मुलाचा पराभव केला. राज ठाकरे म्हणजे मानाला भुकालेलं पोरग आहे. घरी फक्त फडणवीस चहा पिऊन गेलेत तर मग पक्ष बरबाद झाला तरी चालतो," अशा शब्दात जरांगे यांनी राज ठाकरेंवर निशाना साधला.
"चंद्रकांत पाटील यांनी मुलांसाठी चांगल काम केलं म्हणून त्यांच्यावर बोलायच कमी केलं होतं. उपसमितीचे अध्यक्ष असताना मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून त्यांनी वैधता थांबवली होती, हे आम्हाला माहिती आहे. त्यांनी यापुढे शांत राहवं, मराठ्यांच्या शिव्या खाऊ नका," असा इशारा जरांगे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिला.
"सरकार मागण्यांची अंमलबजावणी करत नाही, त्यामुळे उद्यापासून पाणी बंद करणार. सरकार कितीही अन्याय करूदे मराठा समजाने शांत रहावे, दगडफेक करू नका, तुम्हाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मुंबई सोडणार नाही," असे आवाहन जरांगे यांनी आंदोलकांना केले.