जुन्नर : ‘सरकारच्या हातात असताना न्यायदेवतेची मध्यस्थी कशाला’, असा सवाल मराठा मोर्चाचे नेते मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला विचारला. मुंबईच्या आझाद मैदानावरील मराठा आरक्षणासाठी मार्गस्थ होण्यापूर्वी किल्ले शिवनेरीची माती कपाळी लावून त्यांनी मराठा आरक्षणासाठी प्रसंगी मरण्याचीही तयारी ठेवल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, जरांगे गुरुवारी रात्री उशिरा मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. आंदोलनासाठी फक्त एका दिवसाची परवानगी देण्यात आली आहे; पण त्यानंतर जरांगे काय भूमिका घेणार याबाबत भूमिका स्पष्ट न झाल्याने सर्वच यंत्रणा बुचकळ्यात पडल्या आहेत.
‘शिवनेरी’वर पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. गरीब मराठ्यांचा अपमान करू नका, त्यांची मने जिंका, असे सांगून खरे तर सत्ता दिली मराठ्यांनी; पण तुम्ही उलटले मराठ्यांवर, या शब्दांत त्यांनी टीका केली. मराठा समाजाच्या लेकरांच्या वेदनांना न्याय देण्यासाठी ही लढाई सुरू आहे. रायगड आणि शिवनेरी ही प्रेरणास्थळे आहेत. येथे आल्यानंतर यश मिळते, हा इतिहास असल्याचे सांगून मराठाविरोधी आडमुठी भूमिका सोडून द्या, असा इशारा राज्य सरकारला जरांगे यांनी दिला. आम्ही तर आरक्षण मिळवणारच, आता थांबणार नाही, असे सांगून जर एक दिवसाचे उपोषण करायला सांगता, तर एक दिवसात आमच्या मागण्या का मान्य करीत नाही? वारंवार माझ्या समाजाचा, माझा अपमान करतात. कारण, मी ‘मॅनेज’ होत नाही, हे त्यांचे दु:ख आहे. छत्रपतींच्या विचारांवर चालणारे सरकार छत्रपतींच्या विचारांवर चालणार्या मराठ्यांवर गोळ्या घालणार का हा प्रश्न आहे, असे जरांगे यांनी सांगितले.
माझ्या आंदोलनामुळे तीन कोटी मराठ्यांना आरक्षण मिळाले, बाकीच्यांनाही मिळेल. आडमुठेपणाचे धोरण अवलंबू नका. फक्त तुम्ही धीर धरा, असे आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला शिवनेरीवरून बोलताना केले; पण सरकारने आम्हाला आरक्षणासाठी त्रास दिला, तर मराठ्यांची सगळी पोरं मुंबईत येतील, असा गर्भित इशारा त्यांनी दिला.