मुंबई : मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदानात 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत पार पडलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या 5 दिवसांत पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने 128 टन कचरा उचलला.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर मंगळवारी उपोषण मागे घेतले. यानंतर, पालिका मुख्यालय, आझाद मैदान आणि सीएसएमटी स्थानक परिसरातील गर्दी रात्री 9 नंतर कमी झाली. दरम्यान, मंगळवारी (दि.3) आंदोलक निघून गेल्यानंतर, महापालिका आणि रेल्वे प्रशासनाने या परिसरातून सुमारे 128 मेट्रिक टन कचरा गोळा केला. यासाठी महापालिकेने मध्यरात्रीच मोठ्या प्रमाणावर स्वच्छता अभियान केले. सोमवारच्या रात्रीच्या शिफ्टमध्ये 400 हून अधिक स्वच्छता कर्मचारी कामाला लागले, तर मंगळवारी सकाळपासून 1000 हून अधिक कर्मचारी आझाद मैदान परिसरात तैनात केले. तसेच या पाच दिवसाच्या स्वच्छता मोहिमेअंतर्गत पालिकेकडून 6 मोठे कॉम्पॅक्टर, लहान 6 कॉम्पॅक्टर, कचरा वहन गाडी, प्रत्येकी दोन सक्शन आणि जेटींग संयंत्रे, 13 एससीव्ही, 52 टँकर्स अशा 96 वाहनांचा वापर दोन्ही सत्रांमध्ये करण्यात आला. आणि आझाद मैदान आणि महानगरपालिका परिसर पालिका कर्मचार्यांनी 2 सप्टेंबर रात्रीपासून दिनांक 3 सप्टेंबरच्या पहाटेपर्यंत अविरतपणे स्वच्छता करून संपूर्ण परिसर पूर्ववत केला.
मराठा आंदोलनादरम्यान स्वच्छता मोहिमेमध्ये सहकार्य करण्यासाठी मोर्चेकर्यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला आंदोलनकर्त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत स्वच्छता मोहिमेत हातभार लावला. या सहकार्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून आंदोलनकर्त्यांचे आभारही मानण्यात आले.