मुंबई : आंदोलकांसाठी विविध सामाजिक संस्था जेवण, नाश्ता व फळांचे वाटप केले जात आहेत; मात्र या उपक्रमामुळे दक्षिण मुंबईत कचऱ्याचे ढीग पडलेले दिसत आहेत. मुंबईचा राणीहार मरिन ड्राईव्हवर आंदोलकांनी पंगती मांडल्या होत्या. त्यामुळे तेथेही सर्वत्र अस्वच्छता पसरलेली दिसून येत आहे.  (छाया : दीपक साळवी)
मुंबई

Maratha Andolan : आंदोलकांपुढे महापालिका प्रशासन झालं हतबल

एक हजार कर्मचारी, ४०० प्रसाधनगृहे अन् २५ टँकर्स, तरीही सेवा पडतेय अपुरी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मराठा आंदोलकांची गैरसोय होऊ नये व मुंबई स्वच्छ राहावी यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने एक हजार कर्मचारी, २५ पिण्याचे पाण्याचे टँकर आणि ४०० प्रसाधनगृहांचे नियोजन केले आहे. सेवा सुविधा पुरविताना महापालिका प्रशासनाची पुरती दमच्छाक झाली आहे.

तरीही सर्वत्र कचरा पडलेला दिसत आहे. यात पाण्याच्या बाटल्या, पत्रावळी, अन्न रस्त्यावर पडलेले आहे. त्यामुळे आझाद मैदान ते सीएसएमटी परिसराची स्वच्छता करण्यासाठी सुमारे १ हजार कामगार तीन शिफ्टमध्ये सफाईचे काम करत आहेत. आम्ही स्वच्छता करून थकलो आहोत, अशी खंत सफाई कामगारही बोलून दाखवत आहेत.

आतापर्यंत १,५०० डस्टबिन बॅग्स आंदोलकांना वाटण्यात आल्या असून कचरा त्या पिशव्यांमध्ये टाकावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. मात्र कचरा रस्त्यावरच पडलेला दिसत आहे. डास व किटकांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सहा विशेष पथके सतत धूरफवारणी करत आहेत.

वाहतूक तिसऱ्या दिवशीही विस्कळीत

लाखो आंदोलकांची हजारो वाहने एकाचवेळी मुंबईत धडकल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलक आणि वाहने शहरात धडकू शकतात, याचा अंदाज सरकारला नव्हता. त्यामुळे पहिल्याच दिवशी वाहतुकीचे तीन तेरा वाजले होते. त्यादिवशी हाताबाहेर गेलेली परिस्थिती अजूनपर्यंत नियंत्रणात आलेली नाही. आझाद मैदान, सीएसएमटी, बीएमसी, चर्चगेट, मंत्रालय या भागात मोठ्या प्रमाणात आंदोलक रस्त्यावर उतरल्याने मोठी वाहतूक कोंडी होत आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारांवरही वाहतूक कोंडी कायम आहे. मुंबईतील वाहतूक कोंडीची धास्ती घेऊन आतापर्यंत ९० हजार वाहनांनी यु-टर्न घेतला आहे.

रेल्वे प्रशासनाची तारेवरची कसरत

मध्य रेल्वेचे मुख्यालय व जागतिक वारसास्थळात समावेश असलेल्या सीएसएमटी स्थानकावर आंदोलकांनी ठिय्या मारला आहे. कार्यकर्ते दिवसभर आझाद मैदानावर असतात आणि रात्री विश्रांतीसाठी सीएसएमटी स्थानकावर आश्रय घेतात. दररोज हजारो आंदोलक मुक्काम करीत असल्यामुळे या स्थानकाचे संचालन सुरळीत ठेवणे, हे मध्य रेल्वेपुढचे सर्वात मोठे आव्हान ठरले आहे. गर्दी व अस्वच्छतेमुळे स्थानकाचे नियोजन संपूर्णपणे ढासळल्याचे चित्र आहे.

आम्ही सकाळी ७.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत आझाद मैदानासह बाहेरील रस्त्यांची सफाई करत आहोत. या दरम्यान रस्त्यावर जेवण, पाण्याचे बॉटल, केळीचे सालटे, पत्रावाळी, गारबेज बॅग आढळून येत आहेत.
आकाश बल्लाळ, सफाई कामगार, जी. साऊंथ

२५ टन कचरा जमा

गेल्या चार दिवसांपासून आझाद मैदान, सीएसएमटी आणि महापालिका मुख्यालयासमोरील परिसरातून सुमारे २५ मेट्रिक टन कचरा संकलीत करण्यात आला. दररोज १० ते १५ गाड्या हा कचरा वाहन नेत असल्याची माहिती महापालिकेच्या घनकचर व्यवस्थापन विभागाने दिली.

महापालिकेचे आवाहन

महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस कार्यरत असून, आंदोलकांना स्वच्छता व आरोग्याच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. स्वच्छता व सुविधा टिकवण्यासाठी आंदोलकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

400 प्रसाधनगृहे

आंदोलनस्थळी गर्दी वाढत असल्याने एकूण ४०० प्रसाधनगृहे उपलब्ध करून दिली आहेत. यामध्ये ३५० पोर्टेबल प्रसाधनगृहे असून उर्वरित मैदानातील ५० स्थायी प्रसाधनगृहे आहेत. या सर्व प्रसाधनगृहांची स्वच्छता नियमितपणे करण्यासाठी ५ सक्शन व जेटिंग संयंत्रे कार्यरत ठेवण्यात आली आहेत.. आंदोलकांनी देखील ही प्रसाधनगृहे स्वच्छ ठेवावीत, असे प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे.

24 तास आरोग्य सेवा

आंदोलनकर्त्यांच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मैदानात २४ तास वैद्यकीय मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. रविवारी ३१ ऑगस्ट रोजी या कक्षाकडून सुमारे ५७७ आंदोलनकर्त्यांनी उपचारांचा लाभ घेतला. काही रुग्णांना अधिक उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. वैद्यकीय केंद्रात आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध आहे.

25 टँकर्सने पाणी

आंदोलनस्थळी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी महापालिकेने २५ पाणी टँकर्सची व्यवस्था केली आहे. जवळच्या भरणा केंद्रांतून हे टँकर्स भरून आंदोलनकर्त्यांना सतत पाणी पुरवले जात आहे.

मैदानातील गैरसोय दूर

अधूनमधून कोसळणाऱ्या पावसामुळे मैदानात चिखल होऊ नये म्हणून आतापर्यंत महापालिकेने ५ ट्रक खडी टाकली असून, रस्ता आणि मैदान समतल केला आहे. त्यामुळे आंदोलकांना हालचाल करणे सोयीचे झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT