मराठा आंदोलनामुळे व्यावसायिकांचे प्रचंड मोठे नुकसान
मुंबईचाच ताबा घेतल्यामुळे छोट्यामोठ्या दुकानांपासून उद्योगही कमालीचा मंदावला
करोडोंची उलाढाल होणाऱ्या क्रॉफर्ड मार्केटपासून, फॅशन स्ट्रीट ते अगदी फोर्ट मार्केट परिसर सुनसान
मुंबई : दक्षिण मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनामुळे व्यावसायिकांचे प्रचंड मोठे नुकसान होत आहे. आक्रमक आंदोलकांनी संपूर्ण दक्षिण मुंबईचाच ताबा घेतल्यामुळे येथील पानटपरीवाले, फेरीवाले ते छोट्यामोठ्या दुकानांपासून अगदी हॉटेल उद्य-ोगही कमालीचा मंदावला आहे. गेल्या चार दिवसात कारोडोंची उलाढाल ठप्प झाल्याने शासनालाही मोठ्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे.
जेमतेम पंधरा ते वीस टक्के व्यवसाय होत आहे. दिवाळीनंतर व्यवसायाचा गणेशोत्सव हाच एक मोठा काळ असतो. मात्र अशा मोक्याच्या वेळी केवळ पंधरा ते वीस टक्के व्यवसाय होत आहे. त्यामुळे प्रचंड मोठे नुकसान होत आहे. आझाद मैदान परिसरातीलच हॉटेल फक्त बंद आहेत. बाकी सर्व हॉटेल सुरू आहेत. मात्र ग्राहक नाही, असे फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी दै. पुढारीला सांगितले.
दक्षिण मुंबईत फक्त मुंबईतूनच नव्हे तर संपूर्ण राज्यातून लोक येत असतात. व्यापारी आणि ग्राहक यांची दिवसभर मोठी वर्दळ या भागात रात्री उशिरापर्यंत सुरू असते. परंतु आंदोलनामुळे संपूर्ण व्यवहार चार दिवस ठप्प झाले. रस्ते सामसुम होते. रोज करोडोंची उलाढाल होणाऱ्या क्रॉफर्ड मार्केटपासून, फॅशन स्ट्रीट ते अगदी फोर्ट मार्केट परिसर सुनसान होते. चौपाटीवरचे भेल पुरीवाले. रोज हजारोंची उलाढाल करणारे वडापाववाले गायब झाले. खाऊगल्ल्या ओस पडल्या.
भीतीमुळे कामगारच येत नसल्याने हॉटेलमालकांनी हॉटेल बंद ठेवली. हाताच्या बोटावर मोजण्याइतकी जी काही हॉटेल सुरू आहेत तिकडेही कोणीही फिरकेनासे झाले. दुकाने आणि बाजारपेठांमधील विक्री नगण्य पातळीवर आली आहे, त्यामुळे व्यापारी आणि
व्यवसाय मालक असहाय्य झाले आहेत. व्यावसायिक बैठका पुढे ढकलल्या जात आहेत, कार्यालये विस्कळीत झाली आहेत आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याने व्यापारी धास्तावले आहेत.
सोमवारी उच्च न्यायालयाने मराठा आंदोलन आझाद मैदानापुरते सीमित केले आणि रस्ते मोकळे करण्याचे आदेश देत नव्या आंदोलकांना मुंबईची दारे बंद करण्याचे फर्मानही सोडले. त्यामुळे मंगळवारी उशिरा किंवा बुधवारपासून मुंबईच्या बाजारपेठेची झालेली नाके बंदी उठेल अशी आशा आहे.
दक्षिण मुंबईत विक्रेते आणि ग्राहक यांची रोज मोठी रेलचेल असते. लाखो-कोटींची त्यातून उलाढाल होते. गेले चार दिवस हे सगळे थांबल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे. हातावर पोट असलेल्या सामान्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या संपूर्ण परिस्थितीला सरकारच जबाबदार आहे. व्यापाराच्या दुष्टीने महत्वाच्या असलेल्या सणातले नेमके महत्वाचे दिवसच निघून गेले आहेत.अनिल फोंडेकर, अध्यक्ष, मुंबई व्यापारी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र