Maratha Reservation Protest Maharashtra 
मुंबई

Manoj Jarange Patil Protest: राज्यात मराठा आरक्षणाचा एल्गार; जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी बंद

Maratha Reservation Protest Maharashtra: आंदोलना राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे

पुढारी वृत्तसेवा

Manoj Jarange Patil Protest: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती खालावली असली, तरी सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी पाणी घेण्यास आणि सलाईन लावून घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, आंदोलन मागे घेण्याबाबत त्यांची भूमिका अद्याप कायम असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी राज्यभर बंदची हाक देण्यात आली असून, याला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

Beed Maratha Reservation Protest

गेवराईतून मोटारसायकल रॅली अंतरवालीच्या दिशेने; शहरासह तालुक्यातील गावोगावी कडकडीत बंद

गेवराई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी सकाळी गेवराईतून मराठा बांधवांची मोटारसायकल रॅली उत्साहात रवाना झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅलीला सुरुवात करण्यात आली. भगवे ध्वज आणि एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणांनी गेवराई शहर दुमदुमून गेले.

तालुक्यातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव मोटारसायकलींसह रॅलीत सहभागी झाले. आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ठाम पाठिंबा दर्शवत ही रॅली अंतरवाली सराटीच्या दिशेने रवाना झाली. रॅलीदरम्यान करण्यात आलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

दरम्यान, बीड जिल्हा बंदच्या आवाहनाला गेवराई शहरासह तालुक्यातील गावागावांत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापारी व व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला. त्यामुळे गेवराई शहरातील प्रमुख बाजारपेठांसह तालुक्यातील अनेक गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.

Purbhani Maratha Reservation Protest

पूर्णा शंभर टक्के कडकडीत बंद

पूर्णा: मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवली सराटी येथे मागील ६ दिवसांपासून अमरण उपोषण चालू आहे. त्यांची प्रकृती खालावून चिंताजनक बनत चालली असल्यामुळे सकल मराठा समाज सरकार मागण्या मान्य करुन अंमलबजावणी करत नसल्यामुळे सकल मराठा समाज आता आक्रमक झाला आहे.आज ता. ३ ऑगस्ट रोजी परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती.

त्या अनुषंगाने पूर्णा तालुका सकल मराठा समाजाच्या शहर बंद हाकेला ओ देवून सर्व व्यापारी बांधवांनी स्वयंस्फूर्तपणे आपली दुकान प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवली. यावेळी, सकल मराठा समाज बांधवांनी सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. त्याचबरोबर जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे है..., छत्रपती शिवाजी महाराज की जय..."चे नारे देत शहर दुमदुमून टाकले.

त्यानंतर शासनास मराठा आरक्षण संदर्भातील मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी उविपोअ कुंदनकुमार वाघमारे,पोनि सचिन बेंद्रे,सपोनि शिवाजी सिंगनवाड यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता.

Hingoli Maratha Reservation Protest

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ४ सप्टेंबरला हट्टा गाव बंद व रास्ता रोकोचा इशारा

हट्टा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत हट्टा येथील मराठा समाज बांधवांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत असून त्यांच्या मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीची शासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी समाज बांधवांनी केली आहे.

या मागणीच्या समर्थनार्थ दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी हट्टा गाव बंद ठेवून रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनातून सांगण्यात आले आहे. शासनाने मराठा समाजाच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी संबंधित प्रशासनाने आंदोलनाची दखल घेऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Umarga Maratha Reservation Protest

उमरग्यात मराठा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

उमरगा : अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ उमरगा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी (दि. ३) पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता शहरासह ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला मुस्लिम समाज आणि उबाठा शिवसेनेनेही पाठिंबा दिला.

सकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने दुचाकी रॅली काढून बंदचे आवाहन करण्यात आले. त्यापूर्वी मुख्य बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर निघालेल्या रॅलीत मराठा आरक्षणाच्या मागणीसह शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

बंदमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बसफेऱ्या सकाळी बंद होत्या. दुपारनंतर टप्प्याटप्प्याने बससेवा सुरू झाली, मात्र प्रवाशांची संख्या अत्यल्प होती. त्यामुळे नेहमी गजबजलेले बसस्थानक ओस पडल्याचे चित्र दिसून आले. अत्यावश्यक सेवा वगळता शाळा, महाविद्यालये आणि संपूर्ण बाजारपेठ दिवसभर बंद राहिली.

बुधवारी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करत असून त्यांची प्रकृती खालावलेली असतानाही शासनाकडून अपेक्षित निर्णय झालेला नसल्याचे नमूद करण्यात आले. शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी आणि जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उमरगा बंदची हाक देण्यात आल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

मुस्लिम समाज व उबाठा शिवसेनेचा पाठिंबा

मराठा आरक्षणाच्या मागणीला मुस्लिम समाज बांधवांनी बंदमध्ये सहभागी होत समर्थन दिले. उबाठा शिवसेनेनेही बंदला पाठिंबा जाहीर करून सहभाग नोंदविला. दरम्यान, बंद शांततेत पार पडावा यासाठी पोलीस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

Nilanga Maratha Reservation Protest

निलंग्यात रास्ता रोकोनंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

निलंगा : मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या लातूर जिल्हा बंदला निलंगा शहरासह संपूर्ण तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता शहर व तालुक्यातील सर्व आस्थापने दिवसभर कडकडीत बंद ठेवण्यात आली. व्यापाऱ्यांनीही दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला.

सकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी "मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मागण्या तात्काळ मान्य करा" अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.

बंद दरम्यान शासकीय व खासगी रुग्णालये, शासकीय कार्यालये, वाहने, पेट्रोल पंप आणि इतर अत्यावश्यक सुविधा वगळता सर्व आस्थापने बंद ठेवण्यात आली. दुपारनंतर सकल मराठा समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आस्थापने सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले.

निवेदनात जात पडताळणी रद्द करणे, हैदराबाद गॅझेट लागू करणे, शिंदे समितीला मुदतवाढ देणे, सातारा-कोल्हापूर गॅझेटची अंमलबजावणी, ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप, स्वतंत्र मराठा कक्ष सुरू करणे आणि प्रलंबित मागण्यांवर तातडीने जीआर काढण्याची मागणी करण्यात आली.

मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटी येथे गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषण करत असून शासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला. त्यांच्या मागण्या तातडीने मान्य करून उपोषण सोडवावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशाराही सकल मराठा समाजाने दिला. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत गोरेगाव कडकडीत बंद

गोरेगाव : मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांच्या या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज, गोरेगाव यांच्या वतीने आज गुरूवारी (दि.3) गोरेगाव कडकडीत बंद ठेवण्यात आले. सकाळपासूनच गोरेगाव शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. मेडिकल दवाखाने वगळता इतर सर्व आस्थापने बंद ठेवण्यात आली होती.

हा बंद पूर्णपणे शांततेत व अहिंसक मार्गाने पार पडला. कोणत्याही दुकानदारावर किंवा नागरिकावर कसलीही जबरदस्ती करण्यात आली नाही. सकल मराठा समाजातील युवकांनी ठिकठिकाणी उभे राहून शांततेत बंद पाळण्याचे आवाहन केले. यावेळी पोलीस प्रशासनाने देखील चोख बंदोबस्त ठेवला होता.

जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. शासनाने तात्काळ त्यांच्या मागण्या मान्य करून त्यांची प्रकृतीची काळजी घ्यावी अशी भावना बंदमध्ये सहभागी झालेल्या मराठा बांधवांनी व्यक्त केली. गोरेगावकरांनी दाखवलेल्या या एकजुटीमुळे मराठा समाजात एक नवा उत्साह निर्माण झाला असून, या बंदला सर्व स्तरातून पाठिंबा मिळाला आहे.

चुडावा येथे ३०० फुट उंच मोबाईल टॉवरवर बसून मराठा युवकाचे अनोखे आंदोलन

पूर्णा : तालुक्यातील चुडावा येथील बसस्थानक जवळ चांगेफळ रस्ता किनारी एका ३०० फुट उंच मोबाईल टॉवरवर उभे राहून आंदोलन केले आहे. एका मराठा आरक्षण समन्वयक युवकाने जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी ३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता टॉवरवर  बसून अनोखे आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे सदरील आंदोलन हे कुणालाही न सांगता अचानक चालू केल्याने एकच खळबळ उडाली असून स्थानिक पोलीस प्रशासना समोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यांच्या संरक्षणार्थ पोलीस अधिकारी चव्हाण व ईतर कर्मचारी मोबाईल टॉवर शेजारी बसून आहेत. मोबाईल टॉवरवर चढून उंच ठिकाणी उभं राहून आंदोलन करणाऱ्या मराठा युवकाचे नाव नागनाथ श्रिराम गुंडाळे (रा.रुपला पांढरी) असं आहे.

किल्ले धारूर कडकडीत बंद

अतुल शिनगारे

धारूर: मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसह आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी (दि. ३ सप्टेंबर) पुकारण्यात आलेल्या बीड जिल्हा बंदला किल्ले धारूर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकल मराठा समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक, कर्मचारी, कामगार तसेच नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभाग घेतला. त्यामुळे किल्ले धारूर शहरात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला.

माजलगावात रास्ता रोको व माजलगाव कडकडीत बंद

माजलगाव : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी माजलगाव शहरात आज रास्ता रोको व माजलगाव शहर बंद आंदोलन करण्यात आले. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असून, त्यांची प्रकृती खालावत असल्याने मराठा समाजातील कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये चिंता तसेच संतापाचे वातावरण आहे. बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली असताना माजलगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि परभणी रोड येथे समर्थकांनी रास्ता रोको केला. आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर एकत्र येत मनोज जरांगे यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT