मुंबई : महापालिकेने मानखुर्द येथे बुधवारी पोलीस बंदोबस्तात मोठी अतिक्रमण कारवाई केली. घाटकोपर-मानखुर्द जोड मार्गालगत असलेल्या बॉम्बे सोप फॅक्टरीच्या (डब्बा कंपनी) शासकीय जागेवरील 1400 अनधिकृत झोपड्यांवर हातोडा मारत ही 22 एकर जमीन मोकळी करून दिली. महापालिकेच्या एम.पूर्व विभाग आणि मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी कार्यालयाने ही कारवाई केली.
येथील अतिक्रमण कारवाईबाबत जिल्हाधिकारी (अतिक्रमण निष्कासन) पूर्व उपनगरे यांनी आदेश दिले होते. त्यानुसार, महानगरपालिकेचे सह आयुक्त (परिमंडळ-5) देविदास क्षीरसागर, सहायक आयुक्त (एम पूर्व) उज्ज्वल इंगोले यांच्या नेतृत्वात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एम पूर्व’ प्रशासकीय विभागाने ही कारवाई केली.
या कारवाईसाठी सुमारे 200 कामगारांसह 3 पोकलेन, 7 जेसीबी, 10 डंपर, 2 ड्रोन कॅमेरे आदी यंत्रसामग्री पुरविण्यात आली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. मानखुर्द (ता. कुर्ला) येथील नगरभूमापन क्रमांक 1/2 (पै) या मिळकतीवर बॉम्बे सोप फॅक्टरीची (डब्बा कंपनी) ही 22 एकर जमीन आहे. गेल्या काही वर्षांत येथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती.