मुंबई: पावसाळा सुरू झाल्यानंतरही मानखुर्द परिसरातील प्रमुख नाल्याची सफाई पूर्ण न झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. नाल्यात मोठ्या प्रमाणात गाळ, प्लास्टिक कचरा साचून राहिल्याचे चित्र असून, मुसळधार पाऊस झाल्यास पाणी तुंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
स्थानिक स्तरावर वारंवार पाठपुरावा करूनही नाल्याची प्रत्यक्ष सफाई झाली नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी नाल्यातील गाळ काढण्याचे काम लवकरच करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही नाल्याची स्थिती जैसे थे असल्याचे दिसून येत आहे.
नाल्यात साचलेल्या कचरा व गाळामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बाधित होण्याची शक्यता असून, त्यामुळे पाणी तुंबणे, पूरसदृश परिस्थिती निर्माण होणे डासांच्या प्रादुर्भावासह साथीच्या रोगांचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र सैनिक सूरज मादा यांनी सांगितले की, पावसाळा सुरू असताना नाल्यांची सफाई रखडणे ही गंभीर बाब आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन नालेसफाई करावी. आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष काम होणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.