Manikrao Kokate Resignation
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी गुरुवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्याकडे पाठविला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तो पाठविण्यात आला असता तो तत्काळ मंजूर करण्यात आला. त्यानंतर आता कोकाटेंचा राजीनामा राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी देखील मंजूर केला आहे.
दरम्यान, कोकाटे यांच्या अटकेसाठी नाशिक पोलिस आयुक्तालयाचे १३ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात रात्री उशिरा अटक वॉरंट घेऊन पोहोचले होते. कोकाटे यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी नाशिकच्या पोलिस पथकाने चर्चा केली. त्यांचा अहवाल आल्यानंतर पोलिस पुढील कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आज उच्च न्यायालयात कोकाटे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.