Manikrao Kokate (file photo)
मुंबई

Manikrao Kokate Controversy | 'शेतकरी नव्हे, शासन भिकारी'; कृषिमंत्री कोकाटेंचे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य

सभागृहातच मोबाईलवर रम्मी खेळत असल्याच्या व्हिडिओवरुन वादात सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आणखी एक वादगग्रस्त वक्तव्य केलंय

दीपक दि. भांदिगरे

Manikrao Kokate Controversy

विधीमंडळ सभागृहातच मोबाईलवर रम्मी खेळत असल्याच्या व्हिडिओवरुन वादात सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आणखी एक वादगग्रस्त वक्तव्य केले आहे. १ रुपया पीक विमा प्रश्नी बोलताना मंगळवारी (दि.२२ जुलै) कोकाटे यांनी 'शेतकरी भिकारी नाही, तर शासन भिकारी आहे', असे वक्तव्य केले आहे. शेतकऱ्यांकडून शासन १ रुपया घेत नाही. शासन भिकारी आहे, शेतकरी नाही. पीक विम्याची १ रुपया किंमत खूप थोडी आहे. १ रुपये पीक विम्यामुळे पाच- साडेपाच लाख बोगस अर्ज सापडले. ते मी रद्द केल्याचे कोकाटे यांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कोकाटे यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. राज्याला 'भिकारी' म्हणणे हा असंवेदनशीलतेचा कहर असल्याचे सुळे यांनी X ‍‍‍वर पोस्ट करत म्हटले आहे.

''संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेल्या महाराष्ट्राचा मंगलकलश स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांनी आणला. त्यानंतर आलेल्या शासनकर्त्यांनी आणि राज्यातील जनतेने कठोर परिश्रम करुन हा महाराष्ट्र देशातील सर्वात संपन्न असे राज्य बनविले. त्या राज्याला 'भिकारी' म्हणणे हा असंवेदनशीलतेचा कहर आहे. हा राज्याचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री आणि राज्यातील जनतेच्या परिश्रमाचा अपमान आहे. हा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. एकतर शेतकऱ्यांचे एवढे ज्वलंत प्रश्न उभे असताना शेतकऱ्यांच्या प्रती अतिशय असंवेदनशील वागणारे कृषीमंत्री या राज्याने कधीही पाहिले नव्हते. त्यात सभागृहात मोबाईलवर रम्मी खेळून या सगळ्यांवर त्यांनी कडी केली आहे. आजच्या पत्रकार परिषदेत ते पश्चात्ताप व्यक्त करुन राजीनामा देतील अशी अपेक्षा होती. त्यापेक्षा त्यांनी राज्यालाच 'भिकारी' म्हणून कळस गाठला आहे. आम्ही त्यांचा निषेध करतो आणि मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की विद्यमान कृषीमंत्री महोदयांचा राजीनामा घेऊन हे खाते शेती आणि शेतकरी यांच्याप्रती संवेदनशीलतेने वागणाऱ्या व्यक्तीकडे द्या,'' अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

मंत्र्यांनी असे वक्तव्य करणे चुकीचे- मुख्यमंत्री फडणवीस

दरम्यान, कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मंत्र्यांनी असे वक्तव्य करणे चुकीचे आहे', असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

याआधी कोकोटे यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहे. 'कृषिमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी आहे. अजितदादांनी मला हे मंत्रिपद दिले', असे वक्तव्य याआधी कोकाटे यांनी केले होते.

कोकाटेंची ५ वादग्रस्त वक्तव्ये

१. शेतकरी भिकारी नाही, तर शासन भिकारी, असे कोकोटेंचे नवे वादग्रस्त वक्तव्य

२. कोकाटेंनी यापूर्वी शेतकऱ्यांना 'भिकारी' म्हटले होते

३. कर्जमाफीची रक्कम लग्नासाठी खर्च केली जात असल्याचे त्यांनी याआधी म्हटले होते

४. ढेकळांचे पंचनामे करायचे का? असेही ते म्हणाल्याने चर्चेत आले होते

५. अजित पवारांनी मला हे मंत्रिपद दिलं, पण कृषिमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी आहे, असेही बेताल वक्तव्य त्यांनी केले होते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT