Manikrao Kokate
मुंबई : जामीन मंजूर झाल्यामुळे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांची अटक टळली मात्र त्यांच्या आमदारकीवर अजूनही टांगती तलवार कायम आहे. आता आमदारकी वाचवण्यासाठी कोकाटे सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे चार सरकारी सदनिका लाटल्याप्रकरणी नाशिक सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावलेले कोकाटे यांना या याचिकेवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. मात्र, त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला.
माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिल्याने त्यांच्या आमदारकीवरील संकट कायम आहे. नियमानुसार दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर संबंधित लोकप्रतिनिधीचे पद धोक्यात येते. उच्च न्यायालयाने कोकाटेंच्या आमदारकीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय देतात, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, कोकाटे उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत हाती येताच सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती मिळत आहे. प्रकरण उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याने सत्र न्यायालयाच्या निकालाला स्थगिती देण्याची मागणी करणार आहेत.