मालाड : मालवणी गेट क्रमांक 8 येथील म्हाडा प्राधिकरणाच्या खुल्या प्लॉटवर अनधिकृत पार्किंग जोमाने सुरू आहे. साधारण एक -दीड वर्षाआधी म्हाडा प्राधिकरणाच्या मालकीच्या जागेवर असलेले अतिक्रमण हटवून येथे पुन्हा अतिक्रमण होऊ नये तसेच जागा सुरक्षित राहावी तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी सुरक्षा रक्षकांना नेमण्यात आले होते.
सुरुवातीला काही प्लॉट मोकळे करून पत्र्याच्या संरक्षण भिंती उभारल्या. परंतु कालांतराने या ठिकाणाचा वापर अनधिकृत पार्किंगसाठी सुरू झाला. यात सुरक्षा रक्षक, म्हाडा अधिकारी व पार्किंग माफिया यांच्यातील संगनमताने अनधिकृत पार्किंग सुरू झाल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
म्हाडातर्फे कोणालाही पार्किंगसाठी परवानगी दिली नाही. तसेच सुरक्षा रक्षक नेमले आहेत. याबाबत माहिती घेऊन नियमानुसार कारवाई केली जाईल.रोहित शिंदे, म्हाडा अधिकारी