मुंबई : मलेरिया पसरवणार्या अॅनोफिलीस डासांमुळे मुंबईकरांचे जनजीवन त्रस्त झाले आहे. दुसरीकडे, दूषित अन्न व पाण्यामुळे पोटाचे आजारही वाढीस लागले आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये 443 मलेरिया रुग्ण आढळले होते. मात्र, यंदा ही संख्या दुपटीने वाढून 884 वर पोहोचली आहे. गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या देखील वाढून गेल्यावर्षीच्या 722 वरून यंदा 936 इतकी झाली आहे.
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात दररोज सरासरी 29 जणांना मलेरिया, तर 31 जणांना गॅस्ट्रोची लागण होत आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी स्वच्छता आणि आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
हिंदुजा रुग्णालयातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे सल्लागार डॉ. पवन ढोबळे यांनी सांगितले की, पावसाळ्यात गॅस्ट्रोचे रुग्ण नेहमी वाढतात. जून महिन्यात ओपीडीमध्ये सुमारे 40 रुग्ण आले, त्यातील 5 टक्क्यांना दाखल करावे लागले. काहींना केवळ हायड्रेशनमुळे आराम मिळतो, तर काही गंभीर रुग्णांना अँटीबायोटिक्स आवश्यक असतात. दूषित पाणी, रस्त्यावर मिळणारे अस्वच्छ अन्न आणि संसर्गजन्य जीवाणूंमुळे गॅस्ट्रोचा प्रादुर्भाव वाढतो, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, मलेरिया रोखण्यासाठी महापालिकेचा कीटकनाशक विभाग युद्धपातळीवर काम करत आहे. शहरभरात 72,795 ठिकाणी डासांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यापैकी 6,506 ठिकाणी मलेरियाचे डास प्रजनन करताना आढळले आहेत.