Malad Water Crisis Pudhari
मुंबई

Malad Water Crisis: गणपती उत्सव जवळ आला, पण मालाडमध्ये पाण्याची बोंब; सर्वपक्षीय नगरसेवकांचे महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन

स्थायी समिती सदस्य व नगरसेवक तेजिंदरसिंग तिवाना यांनी या आंदोलनाला आक्रमक पाठिंबा देत प्रशासनाच्या मुजोरीवर जोरदार हल्लाबोल केला.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: गणेशोत्सवाच्या तोंडावर मालाड परिसरातील जनता भीषण पाणीटंचाई, अशुद्ध आणि अत्यंत कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याने हैराण असताना, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'पी-पूर्व' आणि 'पी-पश्चिम' प्रभाग समिती सभेदरम्यान प्रशासनाचा निगरगट्ट व बेजबाबदार चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे.

जनतेच्या हक्काच्या पाण्यासाठी प्रभाग क्रमांक ४३ चे नगरसेवक अजित रावराणे यांनी हातात भांडे घेऊन महापालिका कार्यालयासमोर थेट जमिनीवर ठाण मांडले. तर, स्थायी समिती सदस्य व नगरसेवक तेजिंदरसिंग तिवाना यांनी या आंदोलनाला आक्रमक पाठिंबा देत प्रशासनाच्या मुजोरीवर जोरदार हल्लाबोल केला.

लोकप्रतिनिधींच्या या आक्रमक पवित्र्यामुळे पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली मालाडमधील नागरिकांना भेडसावणाऱ्या अपुऱ्या आणि अशुद्ध पाणीपुरवठ्याबाबत प्रभाग समितीच्या सभेत लोकप्रतिनिधींनी तीव्र संताप व्यक्त केला. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना नागरिकांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी उपायुक्त (परिमंडळ ४) यांनी तातडीने एका शिष्टमंडळाला भेट देऊन प्रश्न निकाली काढावा, अशी आग्रही विनंती करण्यात आली होती.

मात्र, "पाण्याचा प्रश्न हा जल अभियंता खात्याशी संबंधित आहे, आमचा याच्याशी काही संबंध नाही!" असे सांगत परिमंडळ ४ च्या उपायुक्तांनी जबाबदारी झटकत अत्यंत आडमुठे धोरण स्वीकारले.

प्रशासनाच्या या थक्क करणाऱ्या निष्काळजीपणावर नगरसेवक तेजिंदरसिंग तिवाना प्रचंड भडकले. "जनतेच्या थेट जीवनमरणाच्या प्रश्नावर साथी नगरसेवक आवाज उठवत असताना आणि पाण्यासाठी रस्त्यावर उतरत असताना महापालिका प्रशासन इतके निर्दयी कसे काय होऊ शकते?" असा घणाघाती सवाल तिवाना यांनी उपस्थित केला.

तसेच, पक्षाच्या चौकटी बाजूला सारून जनतेच्या न्यायासाठी आपण सर्व नगरसेवकांनी आपल्या सहकारी नगरसेवकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, अशी वज्रमुठ आवळत त्यांनी आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला.

तिवाना यांच्या आक्रमक भूमिकेनंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्र येत महापालिका कार्यालयाच्या दारातच जोरदार ठिय्या आंदोलन सुरू केले. "पाणी द्या पाणी द्या!" आणि "नागरिकांना हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे!" अशा वादळी घोषणा दिल्या.

एकदरीत, पालिका अधिकाऱ्यांच्या टाळाटाळीच्या आणि बेजबाबदार वृत्तीमुळे मालाडमधील पाण्याचा प्रश्न आता कमालीचा पेटला असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास हे आंदोलन अधिक तीव्र छेडण्याचा इशारा लोकप्रतिनिधींनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT