मालाड : कोकणी पाडा परिसराची ओळख असलेले सुमारे ७५ वर्षांहून अधिक जुने कोकणी माता मंदिर जमीनदोस्त करत असताना.  (छाया : सुनील गायकवाड)
मुंबई

Malad Kokani Mata Temple Demolition : ७५ वर्षांहून जुन्या कोकणी माता मंदिरावर बुलडोझर!

मंदिर पाडल्याने भक्तांमध्ये संताप; मूर्ती व मुकुटाचा शोध घेण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

मालाड : मालाड पूर्व येथील कोकणी पाडा परिसराची ओळख असलेल्या सुमारे ७५ वर्षांहून अधिक जुन्या कोकणी माता मंदिरावर १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास बुलडोझर चालवून मंदिर जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईमुळे परिसरातील भाविकांतून तीव्र संताप व्यक्त होत असून विकासाच्या नावाखाली कोकणी पाड्याची ऐतिहासिक व धार्मिक ओळख पुसण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, याच मंदिराच्या नावावरून या परिसराला कोकणी पाडा अशी ओळख मिळाली. अनेक पिढ्यांपासून हे मंदिर श्रद्धाळूंच्या आस्थेचे केंद्र राहिले आहे. त्यामुळे मंदिराचे अस्तित्व केवळ धार्मिक नसून परिसराच्या इतिहास व सांस्कृतिक ओळखीशीही जोडले आहे.

मंदिर पाडल्यानंतर भाविकांनी आंदोलन सुरू केले. मंदिरात स्थापित कोकणी माता देवीची मूर्ती व मुकुट नेमके कुठे आहेत, असा सवाल करत त्यांचा तातडीने शोध घेण्याची मागणी केली.मंदिर कोणत्या आधारावर पाडले, याचीही चौकशी करण्याची मागणी भक्तांकडून होत आहे.

दरम्यान, आंदोलनादरम्यान बिल्डरच्या काही व्यक्तींनी भाविकांशी अरेरावी केली, शिवीगाळ व धक्काबुक्की केली, असा आरोप आंदोलकांनी केला आहे. तसेच मंदिराच्या प्रवेशद्वाराला वेल्डिंंग करून बंद केल्याने भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश करता येत नसल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, भक्तांनी माघार न घेता प्रवेशद्वाराबाहेरच ठिय्या आंदोलन सुरू ठेवले.

मंदिराच्या उध्वस्तीकरणाच्या निषेधार्थ रात्री सुमारे साडेआठ वाजता भाजपचे माजी नगरसेवक विनोद मिश्रा आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक गणपत वारी हे मोठ्या संख्येने भाविकांसह कुरार पोलीस ठाण्यात दाखल झाले. यावेळी त्यांनी पोलिसांकडे आपली तक्रार मांडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी तक्रार नोंदवण्याचे निर्देश देत १८ नोव्हेंबर रोजी दुपारी भेटून संपूर्ण प्रकरणावर चर्चा करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.

यावेळी विनोद मिश्रा यांनी भक्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. श्रद्धाळूंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. गरज पडल्यास रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

पत्रकारांशी बोलताना विनोद मिश्रा यांनी डीजेएसएलडीचे मालक ईश्वर शुक्ला यांच्यावर टीका केली. धार्मिक स्थळांना नुकसान पोहोचविणे कोणत्याही परिस्थितीत मान्य केले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. विकासाच्या नावाखाली वर्षानुवर्षे अस्तित्वात असलेल्या धार्मिक स्थळांचे आणि नागरिकांच्या भावनांचे काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

याशिवाय दिंडोशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील प्रभू यांच्या भूमिकेवरही मिश्रा यांनी प्रश्न उपस्थित केले. परिसरातील नागरिकांच्या घरांबरोबरच धार्मिक स्थळांबाबतही लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.

मूर्तींचा शोध, मंदिर पाडण्याच्या कारवाईचा आधार स्पष्ट करणे व दोषींवर योग्य ती कारवाई करणे, या प्रमुख मागण्या आता भाविकांकडून करण्यात येत आहेत. कोकणी माता मंदिराच्या उध्वस्तीकरणामुळे निर्माण झालेला हा वाद आता पोलीस प्रशासन व संबंधित यंत्रणांसमोर महत्त्वाचा प्रश्न बनला आहे.विनोद मिश्रा यांनी विकासाच्या संकल्पनेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

यावेळी मिश्रा यांनी आ. सुनील प्रभू यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. परिसरातील हजारो नागरिकांच्या घरांचे तसेच धार्मिक स्थळांचे प्रश्न सातत्याने समोर येत आहेत. पठाणवाडी परिसरातील मंदिर आणि मूर्तींबाबतही यापूर्वी तक्रारी करण्यात आल्या आहेत. तसेच कोकणी माता मंदिराशेजारी असलेल्या श्री पिंपळेश्वर महादेव मंदिराबाबतही स्थानिकांत नाराजी असल्याचे त्यांनी नमूद केले. लोकप्रतिनिधींची जबाबदारी केवळ आश्वासने देण्यापुरती मर्यादित नसून त्यांनी जनतेत येऊन नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत, अशी मागणी मिश्रा यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT