मालाड ( मुंबई ) : संजय नगरमधील केमिकलच्या गाळ्याला लागलेल्या आगीने असे रौद्र रूप धारण केले, यामध्ये तब्बल १८ गाळे जळून खाक झाले आहेत.
मालाड (पूर्व) परिसरातील पठाणवाडी, संजय नगर आणि पिंप्रीपाडा भागात शनिवारी (दि.18) दुपारी १२ वाजताच्या दरम्यान भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेत १५ ते १८ गाळे जळून खाक झाले. ऐन दिवाळीत ही आग लागल्याने गाळेधारकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.18) साधारणतः १२ वाजता आगा लागल्याचे समोर आले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पंजाब डेअरी व केमिकलच्या गाळ्याला सुरूवातीलl आग लागली. अचानक लागलेल्या आगीने भीषण रुप धारण केले. जवळपास तासभर अग्निशमन दल उशीरा पोहचल्याचे स्थानिकांनी सांगितले.
यावेळी भीतीमुळे वस्तीतील नागरिक आपल्या घरातील गॅस सिलिंडर घेऊन सुरक्षितस्थानी धावपळ करत होते. सुदैवाने तासाभराने अग्निशमन दलाचे पथक पोहचले व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवत आग विझवली. मात्र तोवर १५ ते १८ गाळे जळून खाक झाले होते. या घटनेत जीवितहानी झाली नसले तरी मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.
अग्निशमन दल १ तास उशीरा आल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जीवितहानी झाली नसली तरी येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे, असे स्थानिक रहिवासी-तबरेज यांनी सांगितले.