मुंबई ः मलबार हिलमधील दिग्गज नेत्रतज्ज्ञ सर जमशेदजी दुग्गन यांनी बांधलेला 150 कोटी रुपयांचा बंगला हडप करण्याचा प्रयत्न न्यायालयाने हाणून पाडला. मुंबई सेंट्रल येथील रहिवासी बिल्किश युनूस नमकवाला यांच्या बाजूने देण्यात आलेले प्रशासनाचे पत्र न्या. कमल खाता एकलपीठाने रद्द केले. न्यायालयाच्या निकालाने फसवणुकीच्या कारस्थानालाही हादरा बसला आहे.
30 डिसेंबर 1994 रोजी नेत्रतज्ज्ञ सर जमशेदजी दुग्गन यांचे नातू डॉ. फिरोज दुग्गन यांच्या मृत्युपत्राचे कार्यकारी अधिकारी श्रीन दिनशॉ मिस्त्री, शापूर दिनशॉ तुर्की आणि दिनशॉ मानेक मिस्त्री यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. नमकवाला यांना बंगला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती.
1980 मध्ये डॉ. दुग्गन 27 लाख रुपयांचे कर्ज फेडण्यात अयशस्वी झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नी लेडी जेना दुग्गन यांनी 6 एप्रिल 1993 रोजीच्या कथित मृत्युपत्राद्वारे हा बंगला भेट म्हणून आपल्याला दिल्याचा दावा नमकवाला यांनी केला होता. 2022 मध्ये न्यायालयाने नमकवाला यांच्या नावे प्रशासनाचे पत्र दिल्यानंतर पुढील 15 दिवसांतच त्यांनी बंगला स्वतःच्या नावावर हस्तांतरित केला होता. यावर याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला होता.
न्यायालयाच्या उघड फसवणुकीचे उदाहरण
नमकवाला यांनी बेकायदेशीररित्या बंगला हडप केल्याचा दावा याचीकाकर्त्यांनी केला. यासंदर्भात त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची दखल न्यायमूर्ती कमल खाता यांनी घेतली आणि नमकवाला यांचा बंगला हडप करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. हे प्रकरण केवळ योग्य लाभार्थ्यांवर नव्हे तर या न्यायालयाच्या झालेल्या उघड फसवणुकीचे उदाहरण देते, असे निरीक्षण न्या. खाता यांनी नोंदवले.