Gangster Shahzad Bhatti | पाकिस्तानी गँगस्टर भट्टीच्या नेटवर्कला दणका  
मुंबई

Gangster Shahzad Bhatti | पाकिस्तानी गँगस्टर भट्टीच्या नेटवर्कला दणका

महाराष्ट्र एटीएसचे राज्यभर धाडसत्र : ११२ जणांची चौकशी; मुंबई, ठाणे, पुणे, कोल्‍हापूरसह सांगलीतही छापे

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी मुंबईसह मुंबईसह राज्यातील नऊ शहरांत छापे टाकत पाकिस्तानचा दहशतवादी गँगस्टर शहजाद भट्टी याच्या टोळीशी कनेक्शन असलेल्या ११२ संशयितांची चौकशी सुरू केली.

शुक्रवारी सकाळी सुरू झालेल्या या कारवाईत राज्य एटीएससह सर्व १४ एटीएस युनिटस्‌ उतरले होते. पुणे, मुंबई, नालासोपारा, मीरा रोड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, जळगाव, धुळ्यासह कोल्हापूर, सांगलीत एटीएस पथकांकडून एकाच वेळी ही मोहीम राबविण्यात आली. संशयितांकडून लॅपटॉप, मोबाईल फोन, पेनड्राईव्ह, इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली. प्रत्येक संशयिताच्या सोशल मीडिया प्रोफाइलची पडताळणी करण्यात आली असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याचे एटीएसने स्पष्ट केले.

सोशल मीडियावरून संपर्क

पाकचा दहशतवादी गँगस्टर शहजाद भट्टी मूळचा लाहोरचा असला तरी दुबईत बसून तो आपली गुन्हेगारी टोळी चालवतो. तिथूनच भारतातील तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना दहशतवादी कारवायांत, हेरगिरीत ओढण्याचा त्याचा प्रयत्न सुरू आहे. भट्टीच्या दहशतवादी टोळीत शहजाद भट्टी, त्याचे साथीदार अमजल गुज्जर, अबिट जाट, राणा हुसेन, अब्दुल मेनन, मुन्‍ना झिंगाडा, फारूख खोकर, जाफर सुपारी, सनी टायगर, शेख सलमान, सर्फराज डोंगर ऊर्फ जोरासिंग, अबू मुसा, हे त्याचे हस्तक असून, हे सर्व जण समाजमाध्यमांतून भारतातील तरुणांशी संपर्क ठेवून असल्याचे एटीएसला समजले. फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवरून गँगस्टर्सशी संपर्क ठेवणारे, त्यांच्या पोस्टना प्रतिसाद देणारे किंवा समर्थन करणारे अनेकजण आता ‘एटीएस’च्या ‘रडार’वर आले आहेत. भट्टीच्या संपर्कात राहिल्याचा संशय असलेल्या व्यक्तींची ओळख पटवून त्यांची चौकशी सुरू झाली आहे.

या चौकशीत आक्षेपार्ह मजकूर, आर्थिक मदत, दहशतवादी किंवा गुन्हेगारी नेटवर्कशी संबंध दर्शविणारे पुरावे आढळल्यास गुन्हे दाखल करून या तरुणांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एटीएसची ही कारवाई राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने व्यापक तपासाचा भाग मानली जाते. काही संशयितांकडून सोशल मीडिया चॅट, व्हॉईस कॉल आणि ऑनलाईन संवादाचे पुरावे मिळाल्याचा संशय आहे. या संपर्कामागे केवळ सोशल मीडिया संवाद होता की त्यामागे आर्थिक व्यवहार, माहितीची देवाणघेवाण किंवा इतर बेकायदेशीर कारवाया होत्या, याचाही तपास सुरू आहे. ‘एटीएस’कडून संशयितांची बँक खाती आणि आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी केली जात आहे. या दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तान किंवा इतर देशांमधून फंड पुरवला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

शहजाद भट्टी कोण?

शहजाद भट्टी हा पाकिस्तानशी संबंधित गुन्हेगारी नेटवर्कशी जोडला गेलेला गँगस्टर असून, सोशल मीडियावर त्याचे मोठे जाळे असल्याचा संशय आहे. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील रहिवासी असल्याचे सांगितले जाते. सुरुवातीला तो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून प्रसिद्ध झाला. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि इतर प्लॅटफॉर्मवर त्याचे मोठे फॉलोईंग आहे. भारतीय युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर होत असल्याची माहिती केंद्रीय आणि राज्य सुरक्षा यंत्रणांनी तपासात नोंदवली. तो 'तहरीक-ए-तालिबान हिंदुस्तान' या नावाच्या नव्याने समोर आलेल्या पाकिस्तानी अतिरेकी गटाशी संबंधित असल्याचा संशय आहे.

  • राज्यभर एटीएसची समन्वित कारवाई

  • १४ एटीएस युनिटस्‌ एकाचवेळी सक्रिय

  • ११२ संशयित व्यक्तींची चौकशी

  • मोबाईल, लॅपटॉप आणि डिजिटल पुरावे तपासणीसाठी जप्त

  • सोशल मीडिया नेटवर्क, आर्थिक व्यवहार आणि परदेशी संपर्कांची पडताळणी

  • तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई होणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT