Maitri Park ST depot relocation Pudhari
मुंबई

Maitri Park ST depot relocation: मैत्री पार्क एसटी स्थानक स्थलांतराचा घाट?

चेंबूरकरांमध्ये तीव्र नाराजी; वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबईच्या पूर्व उपनगरातील ऐतिहासिक ओळख बनलेल्या मैत्री पार्क एसटी स्थानकाच्या संभाव्य स्थलांतराच्या चर्चेमुळे चेंबूर परिसरात अस्वस्थतेचे वातावरण आहे. अनेक दशकांपासून हजारो प्रवाशांच्या सेवेत असलेले हे स्थानक हटविण्याचा घाट घातला जात असल्याची चर्चा रंगू लागल्याने स्थानिक नागरिक, प्रवासी आणि व्यापारी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सायन-पनवेल मार्गावरील मैत्री पार्क हे केवळ एसटी स्थानक नाही, तर चेंबूरच्या ओळखीचा एक महत्त्वाचा भाग मानले जाते. मुंबई, नवी मुंबई, ठाणे तसेच कोकण भागात जाणाऱ्या प्रवाशांसाठी हे स्थानक वर्षानुवर्षे मोठा आधार ठरले आहे. विशेषतः गणेशोत्सव, दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात हजारो प्रवासी याच स्थानकातून आपल्या गावी जात असल्याने

‌‘ मैत्री पार्क‌’ हे नाव राज्यभर परिचित झाले आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते या स्थानकाशी केवळ प्रवासाचे नाही तर भावनिक नाते जोडले गेले आहे. अनेक पिढ्या या स्थानकाच्या साक्षीने मोठ्या झाल्या असून चेंबूरमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी मैत्री पार्क हे सहज ओळखता येणारे प्रमुख ठिकाण बनले आहे. त्यामुळे स्थानक स्थलांतरित करण्याचा कोणताही निर्णय घेताना स्थानिकांच्या भावना दुर्लक्षित करू नयेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दरम्यान मेट्रो प्रकल्प आणि वाढत्या वाहतूक कोंडीमुळे प्रशासनाकडून पर्यायी नियोजनाचा विचार सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र, वाहतूक कोंडी हे कारण पुढे करून स्थानक हटविण्यापेक्षा तेथील वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यावर भर द्यावा असे मत स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

वाहतूक पोलीस, सुरक्षा रक्षक, नियोजित पार्किंग आणि बस वाहतुकीचे योग्य नियोजन केल्यास समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते असे जाणकारांचे म्हणणे आहे. चेंबूरकरांच्या दृष्टीने मैत्री पार्क हे आठवणी आणि दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. त्यामुळे निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक जनतेच्या भावना, प्रवाशांची गरज आणि परिसराच्या सामाजिक वास्तवाचा गांभीर्याने विचार व्हावा अशी मागणी आता अधिक तीव्र होताना दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT