मुंबई : प्रकाश साबळे
जोगेश्वरीतील पुलाच्या कामात बाधित झालेल्या वयाच्या शंभरीत असलेल्या एका आजी व आजोबांना महापालिका प्रशासनाने प्रदुषणकारी माहुल गावातील घरांचा ताबापत्र दिले आहे. त्यामुळे या वयातही हे दोघे पालिकेचे उंबरठे झिजवत असून शेवटचा श्वास तरी चांगल्या ठिकाणी घेवू द्या, अशी भावनिक साद पालिकेला घातली आहे.
मुक्ताराम नामदेव चांदमारे (91) आणि पद्दमाबाई भडगे (100) असे त्या आजी आजोबांचे नावे आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे प्रकल्प बाधितांचे माहुल गाव याठिकाणी पुनर्वसन न करण्याचे निर्देश आहे. तरीसुध्दा जोगेश्वरी येथील उड्डाणपूल उभारणीसाठी अडथळा ठरलेल्या 20 बाधितांपैकी तीन जणांना पालिका के.पश्चिम विभागाने चक्क माहूल गाव याठिकाणी पीएपी प्रकल्पाअंतर्गत सदनिका दिली आहे.
हे अलोटमेंट रद्द करून जोगेश्वरी - अंधेरी परिसरात घरे देण्याची त्यांनी मागणी केली. 20 झोपडीधारकांपैकी 17 बाधितांना पालिकेने विक्रोळी येथे सदनिका दिल्या तर उर्वरित तिघांना माहूल गाव याठिकाणी सदनिका जाहीर करण्यात आल्या. यामुळे आम्हालाच याठिकाणी सदनिका का? दिल्या, असा सवाल त्यांनी केला आहे.
गेल्या दीड महिन्यांपासून त्यांनी सदर सदनिकांची चावी घेतलेली नसून लगतच्या परिसरात पुनर्वसन करावे, यासाठी ते पालिका कार्यालयाचे ते उंबरठे झिजवत आहेत. पालिका के.पश्चिम विभागातील सहाय्यक आयुक्त आणि परिरक्षण विभागातील सहाय्यक अभियंता जिंतेद्र महाले, तर दुय्यम अभियंता भरत चौधरी यांच्याकडून सदर प्रकरणाकडे दुर्लक्ष केले जात आहे.
या प्रदुषणकारी गावात पालिका कर्मचारीसुध्दा जाण्यास नकार देत आहे, मग प्रकल्प बाधितांना ही शिक्षा का? असाही सवाल प्रकल्प बाधित मुक्ताराम चांदमारे यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात सहाय्यक अभियंता (परिरक्षण) जितेंद्र महाले यांच्याशी संपर्क केला असता मी माध्यमांशी बोलू शकत नाही. यासाठी मला महापालिका आयुक्त यांची परवानगी घ्यावी लागेल असे सांगितले.
सध्या माझे वय 91 असून मला माहूल गाव याठिकाणी सदनिका दिली आहे. तिथे आधीच मोठ्या प्रमाणात प्रदूषण असून माझा जीव धोक्यात टाकण्याचा प्रकार पालिकेने केला आहे. वयोनुनार मला चालताही येत नाही. सदर इमारतीला लिफ्टही नाही. यामुळे चौथ्या मजल्यावर मी कसा जाणार, हे पालिका प्रशासनाला कळले पाहिजे. यामुळे मला जोगेश्वरी याठिकाणीचं पर्यायी सदनिका द्यावी.मुक्ताराम चांदमारे, बाधित झोपडीधारक