पवन होन्याळकर
मुंबई : मुंबईतील पारंपरिक कंदिलांची बाजारपेठ ‘माहीम कंदील गल्ली’ सध्या उजळून निघाली आहे. माहीमसह माटुंगा, दादर, विलेपार्ले ते बोरिवलीपर्यंतच्या बाजारपेठांतही विविधरंगी, फॅन्सी आणि इको-फ्रेंडली कंदिलांची विक्री जोमात सुरू आहे.
पारंपरिक कागदी कंदिलांपासून फोल्डिंग, वॉल आणि झुंबर टाईप फॅन्सी कंदिलांपर्यंत हजारो प्रकार विक्रीसाठी आहेत. ग्राहक आता प्लास्टिकपेक्षा कागदी, कागद आणि नैसर्गिक साहित्याच्या कंदिलांना प्राधान्य देतात, असे माहीमचे प्रसिद्ध कंदील कारागीर महेश घडवले यांनी सांगितले.
बाजारपेठेत आता ‘चायना’ क्रेझ संपलेली दिसत असून यंदा पर्यावरपूरक आणि ‘देशी’ कंदिलांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. बांबू आणि कागदापासून बनवलेल्या कंदिलांना आधुनिक रूप मिळाले असून प्लास्टिक, फॅब्रिक, ॲक्रेलिक व क्रेप पेपरपासून बनवलेले कंदीलही बाजाराचे आकर्षण ठरले आहेत. काही ठिकाणी ‘एलईडी लाइट’ असलेले फोल्डेबल व थीम बेस्ड कंदील ग्राहकांना आकर्षित करत आहेत. फॅन्सी दुकानांत दोन हजार रुपयांपर्यंतचे आकर्षक कंदील विकले जात असून, सर्वसाधारण किमती 250 ते 600 रुपयांच्या दरम्यान आहेत. काही ठिकाणी ‘ऑफर’ही सुरू आहेत.
यंदा ‘राजदरबार’, ‘द ग्रेट मराठा’, ‘गोल्डन घोळ’ आणि ‘गोल्डन स्टार’ अशा थीमवर आधारित कंदील तयार केले आहेत. किमती 450 ते 700 रुपयांपर्यंत आहेत. कच्चा माल महाग झाल्यामुळे दरात वाढ करावी लागते. कंदील केवळ आम्ही विक्रीसाठी नाहीत, तर ही आमच्या घराघरातील परंपरा असल्याचे महेश घडवले आवर्जून नमूद करतात.
या कंदील गल्लीत दरवर्षी हजारो कंदील तयार होतात. एका कारागिराकडून एक ते दोन लाखांचेे कंदील विकले जातात. पण सर्वच वेळा नफा होत नाही, असे एका विक्रेत्याने सांगितले. काहीजण तयार कंदील साठवून ठेवतात आणि पुढील वर्षी नव्या रंगसंगतीत विक्रीसाठी आणतात. इको-फ्रेंडली मखरांप्रमाणेच ग्राहकांना ‘हटके’ काहीतरी द्यायचे, या भावनेतून काही कलाकारांनी कंदिलांच्या किमती अगदी परवडणाऱ्या ठेवल्या आहेत, असेही कंदील कारागिराने सांगितले.
माहीमच्या गल्लीत फेरफटका मारल्यानंतर, विविध वाडीमधील बहुतांश कुटुंबं ही नक्षीदार व रंगीबेरंगी कागदांपासून कंदील बनवण्यात गुंतलेली दिसतात. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देत ही कुटुंबे मुंबईकरांसाठी बाजारात इको-फ्रेंडली, फोल्डिंग, वॉल आणि झुंबर टाईप अशा असंख्य प्रकारांमध्ये कंदील उपलब्ध करून दिले आहेत.
बांबूच्या काट्यांपासून चौकट तयार करून कागदाने सजवलेला कंदील पूर्णपणे हाताने बनवला जातो. त्यामुळे त्याला विशेष ओळख आणि मागणी असते. या कंदिलांची किंमत 700 ते 2000 रुपये दरम्यान आहे. या कंदिलांना सध्या मंडळाकडून तसेच राजकीय पक्ष कार्यालयातून मागणी आहे.
कागदी कंदील 350 ते 850
फोल्डिंग/वॉल कंदील 350 ते 600
कापडी/खनाचे कंदील 400 ते 600
थीम कंदील 400 ते 800
प्लास्टिक/मिश्र वस्तूंचे कंदील 400 ते 800
छोटे कागदी कंदील 20 पासून पुढे
छोटे प्लास्टिक कंदील 20 ते 50 पासून
हाताने बनवलेले बांबू फ्रेम कंदील 700 ते 2000
आकाश कंदील/आकाशदीप 350 ते 800
कमल कंदील (फुलाच्या आकाराचे) 400 ते 1000
मल्टिकलर बॉल/घनाकार कंदील 300 ते 700
इको-फ्रेंडली/नैसर्गिक साहित्याचे कंदील 150 ते 600
एलईडी लाइट असलेले कंदील 500 ते 1500