मुंबई : राज्यातील एकेकाळची विश्वासार्ह आणि अग्रगण्य कोचिंग संस्था म्हणून ओळख असलेल्या महेश ट्युटोरियल्सने कोणतीही पूर्वसूचना न देता राज्यातील ३३ शाखा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने हजारो विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.
शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर आणि २०२६-२७ या वर्षाचे संपूर्ण शुल्क आगाऊ स्वीकारल्यानंतर अचानक वर्ग बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह पालकांच्या आर्थिक हिताचाही प्रश्न निर्माण झाला आहे. दहावी-बारावीसारख्या निर्णायक टप्प्यावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नियोजन विस्कळीत झाले असून याप्रकरणी राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांचे हित जपावे, अशी जोरदार मागणी पालकांकडून होत आहे.
सुमारे ३८ वर्षांची परंपरा असलेल्या महेश ट्युटोरियल्सने राज्यभरात गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन देणारी संस्था म्हणून ओळख निर्माण केली होती. हजारो विद्यार्थ्यांनी या संस्थेतून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत यश मिळविले. मात्र, गेल्या काही वर्षांपासून संस्थेच्या आर्थिक स्थितीबाबत विविध चर्चा सुरू असतानाच, आता प्रत्यक्ष शाखाबंदीची वेळ आल्याने या संस्थेच्या भवितव्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ७ जुलै २०२६ रोजी सर्व शाखाप्रमुखांची तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर १० जुलैपासून राज्यातील शाखांचे कामकाज थांबविण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतल्याची माहिती संबंधितांना देण्यात आली. या निर्णयापूर्वी संस्थेने नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून पालकांकडून संपूर्ण शुल्क स्वीकारले होते. मात्र, शाखा बंद करताना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पर्यायी व्यवस्था, शुल्क परतावा किंवा पुढील शैक्षणिक नियोजनाबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
स्थापना...३८ वर्षांपूर्वी
देशभरातील एकूण शाखा ५६
महाराष्ट्रातील शाखा ४५
मुंबई-ठाणे परिसरातील शाखा ३९
महाराष्ट्राबाहेरील शाखा ११
अचानक बंद झालेल्या शाखा ३३
फसलेले विद्यार्थी ३,०००+
दहावी-बारावीचे विद्यार्थी २,०००+
सीबीएसई-आयसीएसई विद्यार्थी ५००
शाखाबंदी : १० जुलै २०२६ पासून