मुंबई : महापालिका निवडणुकीच्या अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी महायुतीने राज्यात घवघवीत यश मिळविले आहे. महायुतीचे राज्यात तब्बल 65 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामध्ये भाजपच्या सर्वाधिक 44, शिंदे सेनेच्या 19 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 2 जागांचा समावेश आहे. कल्याण-डोंबिवलीत सर्वाधिक 19 उमेदवारांचा समावेश आहे. त्याचबरोबर मुंबई, पनवेल, ठाणे, जळगाव, अहिल्यानगर आदी ठिकाणीही महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे पाहायला मिळत आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये प्रत्यक्ष मतदान होण्यापूर्वीच भाजप आणि शिंदे सेनेच्या महायुतीने अर्धी लढाई जिंकल्याचे चित्र आहे. येथे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपेपर्यंत महायुतीच्या तब्बल 19 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. उद्धव सेना, काँग्रेस, अपक्ष आणि मनसेच्या उमेदवारांकडून अर्ज मागे घेण्यात आल्याने महायुतीच्या अनेक उमेदवारांचा निवडणूक न लढवताच महानगपालिकेत प्रवेश झाला आहे. बिनविरोध निवड झालेल्या महायुतीच्या 19 उमेदवारांमध्ये भाजपच्या 13 आणि शिंदे सेनेच्या 6 उमेदवारांचा समावेश आहे.
पनवेलमध्ये सात उमेदवार बिनविरोध
पनवेल महापालिका निवडणुकीत शेकाप-महाविकास आघाडीला उमेदवारांनीच झटका दिला. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (दि. 2 जानेवारी) तब्बल सात उमेदवारांनी माघार घेतली. दुसरीकडे भाजपची विजयी घोडदौड सुरूच आहे. भाजपचे सात उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. पनवेल महापालिका निवडणुकीमध्ये शुक्रवारी शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीच्या तब्बल सात उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. याची आता औपचारिक घोषणाच बाकी आहे.
जळगावात महायुतीचे 12 बिनविरोध
जळगाव : सत्ताधारी भाजप-शिंदे सेना युतीने राज्यात होत असलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये विजयाचे खाते उघडले आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर अनेक ठिकाणी भाजपचे दोन अंकी उमेदवार बिनविरोध विजयी झाले. तर शिंदे सेनेचे उमेदवारही बर्याच ठिकाणी बिनविरोध विजयी झाले आहेत. जळगावमध्ये युतीने 12 जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे. अनेकांनी बंडखोरी केली. मात्र, अर्ज माघारी घेतल्यामुळे अनेक ठिकाणी मतदानापूर्वीच उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे.
पिंपरीत राष्ट्रवादीला धक्का; भाजपच्या दोघांचा विजय
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला मोठा धक्का बसला. प्रभाग सहामधील उमेदवाराने अर्ज न भरल्याने भाजपचे रवी लांडगे बिनविरोध निवडून आल्यानंतर आता प्रभाग क्रमांक दहा शाहूनगर, संभाजीनगरमधील पक्षाच्या अधिकृत उमेदवाराने माघार घेतल्याने भाजपच्या सुप्रिया चांदगुडे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
ठाण्यात शिवसेनेचे सात बिनविरोध
ठाण्यात महायुतीची घोषणा झाल्यानंतर खरी लढत ही शिंदे सेना, उद्धव सेना व मनसे यांच्यात होणार अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच शुक्रवारी शिंदे सेनेच्या सात उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. काही जागांवर उबाठाच्या, तसेच अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या सात जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत.
पुण्यात भाजपच्या दोन उमेदवारांनी मारली बाजी
पुणे : भारतीय जनता पक्षाने निवडणुकीआधीच खाते उघडले आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग 35 (ब) मधील उमेदवार मंजुषा नागपुरे आणि 35 (ड) मधील उमेदवार श्रीकांत जगताप हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. नागपुरे यांच्यासह या प्रभागात सहा उमेदवारांचे अर्ज होते. त्यातील दोन अर्ज छाननीत बाद झाले होते. त्यानंतर चार अर्ज शिल्लक होते. त्यातील तीन उमेदवारांनी शुक्रवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी माघार घेतली. त्यामुळे नागपुरे यांची बिनविरोध निवड झाली असून त्या सलग तिसर्यांदा निवडून आलेल्या आहेत.