पुणे : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. यावेळी व्यासपीठावर उपस्थित डावीकडून मंत्री शिवेंद्रराजे भोसले, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, मंत्री जयकुमार गोरे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे. Pudhari
मुंबई

CM Devendra Fadnavis | विधानपरिषदेच्या पाचही जागा महायुतीच जिंकणार : मुख्यमंत्री

निवडणूक पूर्ण ताकदीने लढविण्याचे लोकप्रतिनिधींना आवाहन

पुढारी वृत्तसेवा

पुणे : कोणतीही निवडणूक असो, ती पूर्ण ताकदीने लढवावी लागते. त्यामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि कार्यकर्ते पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत सहभागी होऊन महायुतीच्या सर्व उमेदवारांना जास्तीत जास्त मतदान कसे होईल, यासाठी प्रयत्न करतील. त्यामुळे विधानपरिषदेच्या या पाचही जागांवर महायुतीचेच उमेदवार निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. १४) बावधन येथील एका हॉटेलमध्ये पुणे शहर, पुणे जिल्हा, नगरसेवक, पदाधिकारी आणि जिल्हा परिषद सदस्यांची बैठक घेतली. तसेच, पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची बैठकही त्यांनी घेतली. या बैठकीत निवडणुकीच्या तयारीचा आढावा त्यांनी घेतला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

फडणवीस म्हणाले की, पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता जाधव, तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना विजयी करण्यासाठी भाजपसह महायुतीतील सर्व घटकपक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार आणि मंत्री एकजुटीने काम करतील. पश्चिम महाराष्ट्रातील संघटनात्मक तयारी चांगली असून निवडणुकीचे नियोजनही चोख आहे. पदवीधर मतदारसंघासाठी शरद लाड आणि भैया माने यांनी यापूर्वी चांगली तयारी केली होती. मात्र, पक्षाच्या विनंतीला मान देऊन त्यांनी डॉ. स्मिता जाधव यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात भैया माने, तर सांगलीसह अन्य जिल्ह्यांमध्ये शरद लाड यांनी निवडणुकीची जबाबदारी स्वीकारली आहे, ते चांगले काम करीत आहेत.

नागपूर, पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघांत भाजपचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या उमेदवारांना महायुतीतील सर्व घटकपक्षांचे कार्यकर्ते सहकार्य करतील. अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचा, तर छत्रपती संभाजीनगर विभागात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहे. या दोन्ही ठिकाणी भाजप आणि महायुतीतील अन्य घटकपक्षांचे कार्यकर्ते संबंधित उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न करतील. पुणे विभागातील दोन्ही जागांसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार आणि मंत्री भाजपच्या उमेदवारांसाठी काम करतील. त्यामुळे राज्यातील पाचही जागांवर महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील, असे फडणवीस म्हणाले.

मतदार नोंदणी आणि मतदानावर भर

मतदार नोंदणीच्या आकडेवारीबाबत विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, अनेकदा विधानपरिषद निवडणुकीकडे कमी लक्ष दिले जाते; मात्र या निवडणुकीत अधिक मेहनत आणि नियोजन आवश्यक असते. त्यामुळे मतदार नोंदणी आणि मतदानावर भर देऊन प्रत्येकाने सक्रिय सहभाग घेऊन जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न करावेत. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन केले असून बैठकीत दिसलेली तयारी समाधानकारक असल्याचे सांगत फडणवीस यांनी या संघटनात्मक तयारीच्या जोरावर पाचही जागा जिंकू, असा विश्वास व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT