file photo
मुंबई

विधानसभेवर महायुतीचाच भगवा फडकणार : मुख्यमंत्री शिंदे

Shivsena Dasara Melava 2024 |मला हलक्यात घेऊ नका : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा

मोहन कारंडे

मुंबई : Shivsena Dasara Melava 2024 | लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी हे या महायुती सरकारचे ब्रँड अम्बेसेडर आहेत. राज्यातील जनता आपल्याला आधीच्या पेक्षाही मोठे यश देणार असल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचाच भगवा फडकेल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी व्यक्त केला. आझाद मैदानावर झालेल्या विराट दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला.

तुम्हाला तुमचे सहकारीच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करणार नसतील तर राज्यातील जनता तुम्हाला कशी स्वीकारेल? असा सवाल करतानाच ठाकरे आणि शिंदे सरकारच्या काळातील विकास कामांची जाहीर चर्चा होऊन जावू द्या, असे खुले आव्हानही त्यांनी उद्धव यांना दिले. लोकसभेप्रमाणे विधानसभेला गाफील राहू नका. सरकारने कमी वेळेत घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवा. विरोधकांचे फेक नरेटिव्ह खोडून काढा आणि विरोधकांना चारीमुंड्या चीत करण्यासाठी आतापासून कामाला लागा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना केले. (Shivsena Dasara Melava 2024)

शिवसेनेच्या आझाद मैदानातील दसरा मेळाव्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवसैनिकांची प्रचंड गर्दी उसळली होती. मेळावा सुरू असतानाच थेंब थेंब पाऊस पडत होता. तो वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन तिकडे शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांचे भाषण होण्यापूर्वीच शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिवसैनिकांशी आपल्या आक्रमक शैलीत संवाद साधण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातही हरियाणाच्या विजयाची पुनरावृत्ती होईल. पण, आम्हाला थोडा थोडका विजय नको आहे. आम्हाला मोठा विजय मिळवायचा आहे. केंद्र आणि राज्यात डबल इंजिनचे सरकार असेल तर राज्याचा झपाट्याने विकास होतो. हे आमच्या सरकारने दाखवून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरघोस निधी दिला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यामुळे राज्यातील जनता पुन्हा महायुतीला कौल देईल. बहिणांना तीन हजार दिले असते ! राज्यात सत्तांतर झाले नसते तर राज्य आणखी मागे पडले असते. महाविकास आघाडीच्या काळात अहंकारापोटी मेट्रोचे काम बंद पाडण्यात आले. बुलेट ट्रेन असो, जलयुक्त शिवार योजना असो की मराठवाडा ग्रीड योजना असो, या योजना बंद पाडण्यात आल्या. आज लाडकी बहीण योजनेत हे खोडा घालत आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्पात काड्या करत आहेत. यांनी आपल्या सरकारच्या काळात मेट्रो प्रकल्पात खोडा घातल्याने प्रकल्पाची किंमत १७ हजार कोटींनी वाढली. हेच पैसे वाचले असते तर लाडक्या बहिणींना आम्ही दीड नव्हे तर तीन हजार रुपये दिले असते. पण या लाडक्या बहिणी तुम्हाला सोडणार नाहीत, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीला दिला. पहिली अडीच वर्षे महाराष्ट्र विरोधी महाविकास आघाडी सत्तेवर होती. त्यांनी सुरू अस लेली कामे बंद करण्याचा सपाटा लावला. सर्व प्रकल्पांना त्यांनी स्पीड ब्रेकर लावला. आम्ही हे सगळे स्पीड ब्रेकर उखडून टाकले आणि ज्या सरकारने ते टाकले होते त्या सरकारलाही उखडून टाकले, अशा शब्दात त्यांनी टीकास्त्र सोडले.

मला हलक्यात घेऊ नका: मुख्यमंत्र्यांचा इशारा •

आपले सरकार आले तेव्हा हे सरकार १५ दिवसात पडेल, एका महिन्यात पडेल, नाहीतर सहा महिन्यात पडेल अशी टीका करणाऱ्यांना हा एकनाथ शिंदे पुरून उरला आहे. जनतेच्या आशीर्वादाने आणि तुमच्या साथीने घासून नाही तर ठासून आपण सरकारची दोन वर्ष पूर्ण केली. याचे कारण मी बाळासाहेवांचा शिवसैनिक आणि आनंद दिघंचा चेला आहे, मला हलक्यात घेऊ नका, मी मैदानातून पळणारा नाही तर पळवणारा आहे, अशा इशारा यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीला दिला. माझी दाढी त्यांना खूपते आहे. पण होती दाढी, म्हणून तुमची उद्धवस्त केली महाविकास आघाडी, आता महाराष्ट्राच्या विकासाची जोरात धावू लागली गाडी, अशी कविता सादर करत शिंदेंनी विरोधकांना टोला लगावला.

गारगोट्यांना आता लाज वाटते - शिंदेंचा ठाकरेंना टोला

काही लोकांना हल्ली हिंदू शब्दाची अलर्जी झाली आहे, हिंदू म्हणून घेण्याची त्यांना लाज वाटू लागली आहे. हिंदुहृदयसम्राट म्हणायला काही लोकांची जीभ कचरू लागली आहे. हिऱ्यापोटी जन्माला आलेल्या गारगोट्यांना आता लाज वाटते आहे. बाळासाहेब ठाकरेंचे विचार आपण शिकलो, पण नर्मदेतील गोटे कोरडेच राहिले, अशा शब्दाचे बाण मारत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT