मुंबई

Mumbai mahayuti news: महायुतीचा मुंबईसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध! जाणून घ्या ठळक मुद्दे

Mahayuti Municipal Corporation Election Manifesto 2026: पुढील पाच वर्षे मुंबईत कोणतीही पाणी कर दरवाढ लादली जाणार नसल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या आगामी १५ तारखेला होणाऱ्या रणसंग्रामासाठी महायुतीने आपला महत्त्वाकांक्षी 'वचननामा' आज प्रसिद्ध केला. भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रिपब्लिक पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा मांडण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वचननाम्यातील प्रमुख घोषणा करत, "हा केवळ जाहीरनामा नसून मुंबईचा चेहरामोहरा बदलणारा संकल्प आहे," असा विश्वास व्यक्त केला.

मुंबईला फिंटेक्स सिटी बनवणारच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महायुती-भाजपचा जाहीरनामा जनतेसमोर ठेवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईतले बेकायदेशीर बांगलादेशी आणि रोहगेमुक्त मुंबई करणार, मुंबईतील सर्व ठेकेदाराचे व्हेरीफिकेशन करणार, पालिकेत मराठी भाषा विभाग स्थापन करणार, मराठी तरुणासाठी शिक्षण, रोजगार आणि उद्योगासाठी नवे धोरण राबवणार, मुंबई पालिकेच्या रुग्णालयांच्या सलग्न हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ उभारणार, हुतात्मा स्मारक चौकात जागतिक दर्जाचे संग्रहालय उभारणार, भ्रष्टाचार मुक्त पालिका करण्यासाठी ए आय तंत्रज्ञान आणणार, मुंबईला फिंटेक्स सिटी बनवणार तसेच धारावीमध्ये जागतिक दर्जाची घरे देणार असल्याचेही ते म्हणाले.

महायुतीच्या वचननाम्यातून मुंबईकरांना मोठा दिलासा

पुढील पाच वर्षांच्या नियोजनात मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागू नये आणि शहराला जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत.

  • पाणीपट्टी स्थिर: पुढील पाच वर्षे मुंबईत कोणतीही पाणी कर दरवाढ लादली जाणार नाही.

  • खड्डेमुक्त व कचरामुक्त मुंबई: मुंबईचे सर्व रस्ते खड्डेमुक्त करणार आणि शहर कचरामुक्त ठेवण्यावर विशेष भर दिला जाईल.

  • 'पाताललोक' संकल्पना: वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबईतील अनेक विभाग अंडरग्राऊंड (भुयारी) रस्त्यांनी जोडले जातील. तसेच शहरात भुयारी पार्किंगची निर्मिती केली जाईल.

  • पायाभूत सुविधा: सर्व फूटपाथचे काँक्रिटीकरण होणार असून, मुंबई 'पूरमुक्त' करण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जातील.

महिला आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलती

महायुतीने महिला सक्षमीकरण आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मोठ्या योजनांची घोषणा केली आहे.

  • प्रवास सवलत: महिलांना बेस्ट (BEST) बस प्रवासात ५० टक्के सवलत मिळणार.

  • बिनव्याजी कर्ज: लाडक्या बहिणींना लघु उद्योग सुरू करण्यासाठी ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाईल.

  • बचत गटांना बळ: महिला बचत गटांना ३० हजार रुपयांचे अनुदान आणि त्यांची उत्पादने विकण्यासाठी शहरात खास 'वेंडिंग झोन' उभारले जातील.

  • शिक्षण आणि तंत्रज्ञान: पालिकेच्या सर्व शाळांमध्ये AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) लॅब सुरू होणार. तसेच उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या मुंबईच्या विद्यार्थ्यांसाठी 'मुंबई रत्न शिष्यवृत्ती' योजना सुरू केली जाईल.

फेरीवाला धोरण आणि नियोजन

मुंबईतील रस्त्यांवरील शिस्त कायम राखण्यासाठी आणि फेरीवाल्यांच्या उपजीविकेचा प्रश्न सोडवण्यासाठी ठोस 'फेरीवाला धोरण' राबवण्याचे आश्वासनही या वचननाम्यात देण्यात आले आहे. आम्ही दिलेला शब्द पाळतो. हा वचननामा मुंबईला प्रगतीच्या नव्या शिखरावर नेणारा आणि प्रत्येक मुंबईकराचे जीवन सुखकर करणारा ठरेल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT