Maharashtra Assembly Election 2024
महायुतीतील विधानसभा निवडणूक जागावाटप  File Photo
मुंबई

महायुतीत विधानसभेसाठी रस्सीखेच; भाजप धरणार १७० जागांचा आग्रह

पुढारी वृत्तसेवा

महायुतीत लवकरच जागावाटपाच्या चर्चेला तोंड फुटणार आहे. मात्र चर्चेआधीच तीनही पक्षांनी जादा जागा मिळविण्यासाठी दावे-प्रतिदावे सुरू केल्याने जागावाटपाची रस्सीखेच रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजप नेत्यांच्या कोअर टीमच्या बैठकीत जागावाटप लवकर करतानाच किमान १७० जागा मिळविण्याची रणनीती ठरविण्यात आली आहे; तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही किमान ८० ते ९० जागा मिळाव्यात म्हणून आग्रही राहण्याची भूमिका घेतल्याने जागावाटप हा महायुतीत कळीचा मुद्दा बनण्याची शक्यता आहे.

भाजप १७० जागांसाठी आग्रही

भाजपने लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा विधानसभा निवडणुकीत काढण्यासाठी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी भाजप नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या कोअर टीमच्या बैठकीत विधानसभेचे जागावाटप लवकर करतानाच १७० जागांसाठी आग्रही राहण्याचा निर्णय घेण्यात आला. २०१९ ला भाजपने १६४ जागा लढविल्या असून यावेळी किमान १७० जागा लढविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेनाही लोकसभा निवडणुकीत दिलासादायक विजयाने जागा वाटपासाठी आतापासून आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे सुमारे ४० आमदार असून शिवसेना वर्धापनदिनी पक्षाच्या मेळाव्यात रामदास कदम यांनी १०० जागांची मागणी केली आहे. एवढ्या जागा मिळणार नसल्याची शिंदे गटाला कल्पना असली तरी किमान ८० जागांसाठी शिंदे सेना आग्रही राहणार आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हव्यात दुप्पट जागा

राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनीही विधानसभेला राष्ट्रवादीला किमान ८० ते ९० जागा मिळाव्यात, अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या ४२ आमदार आहेत. शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही आमदार संख्येच्या दुप्पट जागा हव्या आहेत, जेणेकरून आपली आमदार संख्या राखता येईल. त्यामुळे महायुतीत जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच रंगणार आहे.

SCROLL FOR NEXT