Eknath Shinde (Pudhari Photo)
मुंबई

ZP Results Analysis Maharashtra: जिल्हा परिषदेत भाजपची ग्रामीण मुसंडी; कोकणात ठाकरे गटाचे गड कोसळले

रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गमध्ये शिंदे गटाचा प्रभाव; पश्चिम महाराष्ट्रातही महायुतीची घोडदौड

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : नरेश कदम

महापालिका, नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने ‌‘शहरी बाज‌’ असलेला शिक्का पुसला असून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण या महाविकास आघाडीतील काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे गट या तिघांचे गड उद्ध्वस्त केले आहेत. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांचचे कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग हे गड काबीज केले. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रशासनाचा गाडा महायुतीच्या हाती आला आहे.

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप फारशी चमक दाखवेल असे दिसत नव्हते. कारण या जिल्हा परिषदा पश्चिम महाराष्ट्र , मराठवाडा आणि कोकण या आघाडीतील काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट यांचे परंपरागत गड राहिले आहेत. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे प्रचार सभा घेणार नाही, असे स्पष्ट केले. एकनाथ शिंदे यांनी प्रचारसभा घेतल्या, पण राजकीय वक्तव्ये केली नाहीत. पण महायुतीचा विकासाचा अजेंडा आणि लाडकी बहीण योजना यांचा प्रभाव अजूनही टिकून आहे. विरोधक यांनी आत्मविश्वास गमावला असल्याचे दिसत आहे. कोल्हापूर, लातूर असे काही काही अपवाद वगळले तर विरोधक लढलेच नाहीत.

कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे गड ठाकरे गटाचे परंपरागत गड होते. पण मुंबईतून लादलेले विनायक राऊत यांच्या सारखे नेते पक्ष कोकणातून संपवत आहेत. जुन्या शिवसेनेच्या नेत्यांना डावलून गेल्या दहा वर्षांत काँग्रेस राष्ट्रवादीतून उदय सामंत, दीपक केसरकर यांच्यासारखे नेते आयात केले. त्यांनी सत्ता असताना इकडे मंत्रिपदे भूषविली आणी सत्ता जाताच ते निघून गेले. रत्नागिरी जिल्ह्याची पूर्वीची शिवसेना सामंत बंधूंनी अजगरासारखी गिळली आहे. सिंधुदुर्गात राणे परिवाराला शिंदे यांनी कुमक पुरविली. राणे यांच्या घरात दोन्ही पक्ष आहेत. त्यामुळे मेहनत घेतली, तर उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे कोकणात फिरकलेही नाहीत. भास्कर जाधव यांनी केवळ आपल्या मुलाला निवडून आणले. त्यामुळे ऐशी स्थिती राहिली तर ठाकरे गटाची कोकणात इति म्हणण्याची वेळ येईल.

रायगडमध्ये शिंदे गट विरुद्ध सुनील तटकरे असा सामना होता. शिंदे गटाने रायगडमध्ये सर्वाधिक जागा मिळविल्या. पण या जिल्ह्यात महायुतीत शिंदे गट आणि संघर्ष हा यापुढे असेल.

पुणे जिल्हा परिषद ही अजित पवार गटाने एकहाती जिंकली. अजितदादांच्या पश्चात पुणे जिल्ह्यातील जनतेने त्यांच्या कामाची पोचपावती दिली. पण हे यश टिकविण्याची जबाबदारी त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांची राहणार आहे.

सांगली,सातारा आणि कोल्हापूर हे काँग्रेस आणि शरद पवार गटाचे गड राहिले आहेत. पण कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी गड अखेरपर्यंत लढवला. पण समोरचे आव्हान भलेमोठे होते. अजित पवार गटाने सर्वाधिक जागा जिंकल्या. सांगलीत जयंत पाटील यांनी आव्हान परतविले. राष्ट्रवादीच्या साताऱ्यात भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या. काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या गढी बघितल्या. पश्चिम महाराष्ट्रचे राष्ट्रवादीचे राजकारण दिवंगत अजित पवार यांच्या पश्चात आता कोणत्या वळणाने जाईल हे काळ ठरवेल. या साखरसम्राटाच्या पट्ट्यात भाजप आणि शिंदे गट घुसला आहे. त्यामुळे भविष्यात याचे परिणाम दिसतील.

सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपचे राम सातपुते यांनी एकहाती सत्ता आणली आणि पराभवाचे जुने हिशेब चुकते केले. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या घराण्यांचा प्रभाव दिसला नाही.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, परभणी या जिल्हा परिषदेत पूर्वी जुन्या शिवसेनेचे म्हणजे ठाकरे यांचे वर्चस्व होते. पण ही जागा आता भाजपसोबत शिंदे गटाने घेतली आहे. अजित पवार गट परभणीत आहे, तर ठाकरे गट डबल डिजिटमध्येही नाही. मुंबईचा पराभव त्यांच्या इतका जिव्हारी लागला आहे की, त्यांनी पक्षाचे कार्यकर्ते वाऱ्यावर सोडले आहेत. ‌‘खाईन तर तूपाशी, नाही तर उपाशी‌’ ही ठाकरे गटाची अवस्था आहे. ठाकरे बंधू एकत्रपणे ग्रामीण महाराष्ट्रातील निवडणुका लढवू शकले असते, पण मेहनत करण्याची इच्छाशक्ती लोपली आहे.इव्हेंटचे दिवस संपले आहेत. लोकांमध्ये जाण्याची गरज आहे,अन्यथा भविष्यात उरली सुरली संघटना अधिक कमकुवत होईल.

एकनाथ शिंदे यांची घोडदौड

महापालिकेच्या निवडणुकीप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट भाजपपाठोपाठ दुसऱ्या नंबरवर राहिला आहे. त्यांची घोडदौड सुरू आहे. शिंदे यांची स्पर्धा भाजपसोबत असल्याचे निकालावरून दिसत आहे. कारण भाजपच्या जवळपास शिंदे गट दिसत आहे.शिंदे यांना ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई आदी महापालिकेत रोखण्याचा प्रयत्न भाजपने केला होता, पण आता भविष्यात भाजपपुढे दुसरे कोणाचं आव्हान दिसत नाही. पण शिंदे गटाला वेसण घालावी लागेल, असे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT