Maharashtra ZP Election Results 
मुंबई

Maharashtra ZP Election Results : आघाडीच्या बालेकिल्ल्यात भाजपचे ‌‘कमळ‌’; ठाकरेेंचे कोकण शिंदेंनी केले काबीज

ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रशासनाचा गाडा महायुतीच्या हाती!

पुढारी वृत्तसेवा

नरेश कदम

मुंबई ः महापालिका, नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने ‌‘शहरी बाज‌’ असलेला शिक्का पुसला असून, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण या महाविकास आघाडीतील काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे गट या तिघांचे गड उद्ध्वस्त केले आहेत. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांचे कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग हे गड काबीज केले. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रशासनाचा गाडा महायुतीच्या हाती आला आहे.

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप फारसी चमक दाखवेल, असे दिसत नव्हते; कारण या जिल्हा परिषदा पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण या आघाडीतील काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट यांचे परंपरागत गड राहिले आहेत. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे प्रचार सभा घेणार नाही, असे स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचार सभा घेतल्या; पण राजकीय वक्तव्ये केली नाहीत; पण महायुतीचा विकासाचा अजेंडा आणि लाडकी बहीण योजना यांचा प्रभाव अजून ही टिकून आहे. विरोधक यांनी आत्मविश्वास गमावला असल्याचे दिसत आहे. कोल्हापूर, लातूर असे काही काही अपवाद वगळले, तर विरोधक लढलेच नाहीत.

कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे गड ठाकरे गटाचे परंपरागत गड होते; पण मुंबईतून लादलेले विनायक राऊत यांच्यासारखे नेते पक्ष कोकणातून संपवत आहेत. जुन्या शिवसेनेच्या नेत्यांना डावलून गेल्या दहा वर्षांत काँग्रेस, राष्ट्रवादीतून उदय सामंत, दीपक केसरकर यांच्यासारखे नेते आयात केले. त्यांनी सत्ता असताना इकडे मंत्रिपदे भूषविली आणि सत्ता जाताच ते निघून गेले. रत्नागिरी जिल्ह्याची पूर्वीची शिवसेना सामंत बंधूंनी अजगरासारखी गिळली आहे. सिंधुदुर्गात राणे परिवाराला शिंदे यांनी कुमक पुरविली. राणे यांच्या घरात दोन्ही पक्ष आहेत. त्यामुळे त्यांनी मेहनत घेतली. तर उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे कोकणात फिरकलेही नाहीत. भास्कर जाधव यांनी केवळ आपल्या मुलाला निवडून आणले. त्यामुळे अशी स्थिती राहिली, तर ठाकरे गटाची कोकणात इति म्हणण्याची वेळ येईल. रायगडमध्ये शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे असा सामना होता. शिवसेना शिंदे गटाने रायगडमध्ये सर्वाधिक जागा मिळविल्या; पण या जिल्ह्यात महायुतीत शिंदे गट आणि संघर्ष हा यापुढे असेल.

पुणे जिल्हा परिषद ही राष्ट्रवादी अजित पवार गटाने एकाहाती जिंकली. अजितदादांच्या पश्चात पुणे जिल्ह्यातील जनतेने त्यांच्या कामाची पोचपावती दिली; पण हे यश टिकविण्याची जबाबदारी त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांची राहणार आहे. सांगली, सातारा आणि कोल्हापूर हे काँग्रेस आणि शरद पवार गटाचे गड राहिले आहेत; पण कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी गड अखेरपर्यंत लढविला; पण समोरचे आव्हान भलेमोठे होते. अजित पवार गटाने सर्वाधिक जागा जिंकल्या. सांगलीत जयंत पाटील यांनी आव्हान परतविले. राष्ट्रवादीच्या साताऱ्यात भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या. काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या गढी बघितल्या. पश्चिम महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे राजकारण दिवंगत अजित पवार यांच्या पश्चात आता कोणत्या वळणाने जाईल, हे काळ ठरवेल.

सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपचे राम सातपुते यांनी एकहाती सत्ता आणली आणि पराभवाचे जुने हिशेब चुकते केले. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या घराण्यांचा प्रभाव दिसला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT