CM Fadnavis | दोन राखीव वनक्षेत्रांना अभयारण्याचा दर्जा 
मुंबई

CM Fadnavis | दोन राखीव वनक्षेत्रांना अभयारण्याचा दर्जा

१४ संवर्धन राखीव क्षेत्रे घोषित करण्यास मान्यता; वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील रान म्हशींसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्र आणि ठाणे जिल्ह्यातील तानसा वन्यजीव अभयारण्य क्षेत्राजवळील नवीन विस्तारित तानसा वन्यजीव अभयारण्यास वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पुणे, रायगड, नाशिक, नंदुरबार, ठाणे, पालघर आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील १४ संवर्धन राखीव क्षेत्रांच्या प्रस्तावांना मान्यताही यावेळी देण्यात आली.

कोलामार्का संवर्धन क्षेत्र हे रान म्हशींसाठी उपयुक्त क्षेत्र असल्याने त्यास अभयारण्य म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय १४ संवर्धन राखीव क्षेत्रांच्या प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये पुणे/रायगड जिल्ह्यातील वेल्हे मुळशी, पुणे जिल्ह्यातील भोरगिरीगड, नाशिकमधील दिंडोरी, सुरगना व ताहाराबाद, नंदुरबारमधील चिंचपाडा, रायगडमधील अलिबाग व घेरा मानिकगड, पुणे/रायगडमधील लोणावळा, ठाणेमधील गुमतारा, पालघरमधील जव्हार, आशेरीगड व धामणी आणि चंद्रपूरमधील एकारा यांचा समावेश आहे.

मानक कार्यपद्धती तयार करा

अभयारण्यांमधील धरणांची दुरुस्ती, पुनर्वसन आणि गाळ काढण्याची नियमित कामे संबंधित अभयारण्यांच्या व्यवस्थापन आराखड्यात समाविष्ट करावीत. नियमांशी सुसंगत मानक कार्यपद्धती तयार करून तीन महिन्यांत व्यवस्थापन आराखड्यांमध्ये आवश्यक सुधारणा कराव्यात. या कामांसाठी प्रत्येक वेळी स्वतंत्र मान्यता घेण्याऐवजी संबंधित वन्यजीव अधिकाऱ्यांना पूर्वसूचना देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

ठाणे जिल्ह्यातील ‘तानसा’ हरणांसाठी प्रसिद्ध

ठाणे : अमोल देशपांडे

सहा गावांतील ५८८.७६७ हेक्टर महसुली व खासगी क्षेत्राचा विस्तारित अभयारण्यात समावेश करण्याच्या प्रस्तावाला राज्य वन्यजीव मंडळाने मान्यता दिली आहे. तानसा वन्यजीव अभयारण्याच्या परिसरातील मौजे ओगदा, खोडदे, तिरमाळ, पाचघर, फणसाड आणि आमले या सहा गावांतील महसुली व खासगी क्षेत्राचा विस्तारित अभयारण्यात समावेश करण्यास मान्यता देण्यात आली. तानसा वन्यजीव अभयारण्य मानवविरहित करण्याच्या उद्देशाशीही हा प्रस्ताव संबंधित आहे. तानसा जलाशय हा मुंबईच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील महत्त्वाचा स्रोत आहे. तानसा आणि वैतरणा नदीखोऱ्यांशी संबंधित जलस्रोत, पाणलोट क्षेत्र आणि वनसंपदा यांचा नैसर्गिक पर्यावरणाशी जवळचा संबंध आहे. तानसा जंगलातील जैवविविधता, पक्ष्यांचे अधिवास, वन्यजीवांचे सुरक्षित भ्रमणक्षेत्र आणि मुंबईच्या पाणीपुरवठ्याशी जोडलेली नैसर्गिक व्यवस्था यांचे संरक्षण ही दीर्घकालीन गरज आहे. सहा गावांतील ५८८.७६७ हेक्टर क्षेत्राचा विस्तारित अभयारण्यात समावेश करण्यास मिळालेली मान्यता या दिशेने महत्त्वाची ठरते.

गडचिरोलीतील कोलामार्का रान म्हशींसाठी प्रसिद्ध

गडचिरोली : जयंत निमगडे

जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील कोलामार्का परिसरातील रान म्हशींसाठी राखीव असलेल्या वनक्षेत्राला राज्य वन्यजीव मंडळाने अभयारण्याचा दर्जा देण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे मध्य भारतातील जनुकीयदृष्ट्या शुद्ध असलेल्या शेवटच्या रान म्हशींच्या अस्तित्वाला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे. सिरोंचा वनविभागांतर्गत इंद्रावती नदी परिसरात आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात कोलामार्काचे जंगल प्रसिद्ध आहे. या जंगलात मोठ्या प्रमाणावर रान म्हशी आढळतात. गडचिरोली जिल्ह्यात सुमारे १८ हजार ७२ हेक्टर क्षेत्र या वनक्षेत्राने व्यापलेले आहे. उर्वरित क्षेत्राचा समावेश छत्तीसगड राज्यात होतो. दुर्मीळ आशियायी रान म्हशींचे अस्तित्व प्रामुख्याने याच भागात आढळते. त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या हेतूने शासनाने ८ जानेवारी २०१३ रोजी कोलामार्का जंगलाला संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित केले होते. त्यानंतर या दुर्मीळ रान म्हशींच्या संख्या आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाला अधिक भक्कम कायदेशीर व प्रशासकीय संरक्षण मिळावे, या हेतूने या क्षेत्राला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT